आमच्या विषयी

समाजात वाचनाची गोडी वाढावी यासाठी अनेक जण जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात . काळाच्या ओघात ग्रंथालयांनीही वाचकाभिमुख होण्याचा सतत प्रयत्न केला.  तरीही सुधारणेला वाव राहतोच. कामाच्या व्यापात बुडालेल्या आजच्या मराठी वाचक बांधवांना इच्छा असूनही  वाचनासाठी वाचनालयात जाणे शक्य होत नाही .

ही काळाची गरज ओळखून, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेचे विश्वस्त श्री. विनायक रानडे यांनी एकच ध्यास घेतला आणि  तो म्हणजे वाचकांना त्यांच्या घराजवळ उत्तम वाचनीय पुस्तके उपलब्ध करून देण्याचा! त्यातूनच २००९ ला  अशा वाचन प्रेमींसाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी ‘ या योजनेचा उगम झाला.भारतात ह्या योजनेत १०० पुस्तकांची एक पेटी असते, जी साधारण ३५ वाचकांच्या समूहासाठी असते.

२०१४ मध्ये डॉ संदीप कडवे आणि त्यांच्या पत्नी सौ स्वाती कडवे यांनी ही योजना भारताबाहेर सर्वप्रथम दुबईला नेण्यासाठी आपल्या मित्रपरिवाराच्या सहGTD (about page)कार्याने पुढाकार घेतला त्यावेळी त्याचे स्वरूप थोडेसे बदलले. एका पेटीत दर्जेदार, विविध विषयांची, विविध लेखकांची २५ निवडक पुस्तके वाचकांना विनामूल्य वाचनासाठी उपलब्ध करून दिली गेली. सुरुवातीला दुबई, शारजा, रस-अल- खेमा येथे ८ पेट्यांनी सुरुवात झाली. देणगीदारांच्या व समन्वयकांच्या सहकार्यामुळे तसेच वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे लवकरच अबू धाबी, फुजेरा, अजमान तसेच सौदीमध्ये अल -खोबार व बहरीन मध्ये या योजनेचा तीन वर्षात २२ पेट्यातील ५५० पुस्तके असा विस्तार झाला आहे. या निमित्ताने  साहित्याचे व लेखनशैलीचे विविध प्रकार म्हणजे कथा, कादंबरी , विनोदी , रहस्य , चरित्र , प्रवासवर्णन . . . . . . अशी सर्व समावेशक ग्रंथ संपदा विनामूल्य व आपल्या घराजवळच वाचावयास मिळत आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या निवड समिती मार्फत प्रत्येक पेटीत वैविध्यपूर्ण तसेच कोणतेही पुस्तक दुसऱ्या पेटीत सारखे होणार नाही याची दक्षता घेतली जाते. दर  ३ महिन्यांनी ग्रंथ पेटी इतर गटांसोबत बदलली जाते. पेटी एका समन्वयकाकडे घरी ठेवली असते व आसपासच्या परिसरातील मराठी वाचक ग्रंथ पेटीतून वाचनासाठी सहजगत्या पुस्तक घेवून जावू शकतात. एका पेटीमागे साधारण  १० वाचकांना यामुळे वाचनाचा आनंद घेता येतो.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लोकांचा विशेषतः लहान मुलांचा वाचनातील रस कमी होत चालला आहे अशी सतत प्रतिक्रिया येत असते. त्यावर सुयोग्य उपाय म्हणून  बालग्रंथालय विभाग आता चालू झाला आहे. अनेक मराठी पालकांना आपल्या मुलांनी मातृभाषे बरोबर इंग्लिश पुस्तकांचे वाचन करावे असे वाटते. त्यासाठी इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० छोट्या पुस्तकांची एक पेटी असून त्यात काही  इंग्लिश आणि बहुसंख्य मराठी पुस्तकं आहेत. अशा ६ बाल पेट्या UAE मध्ये उपलब्ध आहेत . सध्या जास्तीत जास्त सोशल मिडियावर दिसणारी मुले आता पुस्तकांमध्येही रमतील असा विश्वास वाटतो.

खालील पैकी कुठल्याही प्रकारे  आपण ही योजना वृद्धिंगत करण्यास सहकार्य करू शकता :-

  • आपल्या परिचित असणाऱ्या मराठी वाचकांपर्यंत या योजनेची महिती देणे.
  • आपल्या परिसरात मराठी वाचकांचा गट  तयार करून ग्रंथपेटी सुरु करणे.
  • आपल्या किंवा आप्तेष्टांच्या वाढदिवसानिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानला  देणगी देणे
  • आपल्या आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ या वाचकप्रिय उपक्रमास देणगी देणे

देणगीदारांनी व वाचकांनी अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या समन्वयकाशी जरूर संपर्क साधावा.

हि पुस्तकयात्रा आपल्यासाठी विचारांची देवाण -घेवाण करणारी संवादिनी होऊन आपले जीवन समृद्ध करो ही सदिच्छा  !!!