पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ११

परीक्षण क्रमांक : ११

दिनांक: २५ फेब्रुवारी २०२३

पुस्तकाचे नाव: वेधक विज्ञान कथा

लेखिका : डॉ. सुरेखा बापट

ग्रंथपेटी क्रमांक:

पुस्तक क्रमांक: ११०

परीचयकर्ता : गजानन पाटील

समन्वयिका: डॉ. पल्लवी बारटके, अबू धाबी

     

ग्रंथपेटीतून पुस्तक घेताना, इतकी सारी पुस्तकं बघून कोणतं पुस्तक घ्यावं हा प्रश्न पडलेला असताना विज्ञान विषयक पुस्तकावर नजर पडली. तसं शालेय जीवनापासून ते आजपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये कार्यरत असल्यामुळे ‘वेधक विज्ञान कथा’ हे पुस्तक निवडले.

प्रस्तुत पुस्तकांमध्ये एकूण बारा कथा समाविष्ट केल्या आहेत. प्रत्येकाच्या मनात सतत घोळणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे या बारा कथांमध्ये लिखित केली आहे. लेखिकेचा खगोलशास्त्राचा अभ्यास आणि कल्पनाशक्ती पृथ्वी आणि थिआचे काय झाले या कथेमधून समजते. पृथ्वी, मंगळ आणि चंद्र या ग्रह आणि उपग्रहाची उत्पत्ती, लाखो वर्षांपूर्वी मंगळावरील मानवाचं अस्तित्व आणि नंतर पृथ्वीवर स्थलांतरित होण्याचं वर्णन कथानुरूप पद्धतीने सुंदररीत्या मांडले आहे. विज्ञान आणि साहित्याचा मेळ साधणारा हा कथासंग्रह पुनर्जन्माचा उलगडा ‘साक्षीदार’ आणि ‘मालती माधव’  या कथेत करतो. पतीच्या मृत्यूनंतरही मालतीला माधवरावांचे धीर देणारे अस्तित्व हवेहवेसे वाटते. कथा संपेपर्यंत पुनर्जन्म ही एक कल्पना नसून सत्य आहे असा विश्वास बसतो. त्याबरोबरच, वैद्यकीय शास्त्रामधील क्लोनिंगशी संबंधित ‘अपराध तिचा केला’ या कथेतून  सदसद्विवेक जागृत करणारे वैज्ञानिक अजून अस्तित्वात आहेत याची जाणीव करून दिली आहे. वंशपरंपरा चालवण्यासाठी कुटुंबात मुलगा जन्माला येणे, त्यासाठी चालू असलेले अनुचित प्रकार, त्याचं वर्णन आणि त्यावर शास्त्रीयदृष्ट्या उकल करून देणारे उत्तर ‘वैज्ञानिक दृष्टी’ या कथेतून सादर केलं आहे. वंशाचे गुणधर्म मुलीमध्ये उतरतात, संक्रमित होतात. तरीही वंश वा कुळ चालवणाऱ्या या संततीविषयी समाजमन अनुदार का? या अनुत्तरीत प्रश्नाचे उत्तर समर्पकपणे पुढे ठेवले आहे.   
        

आसपासच्या अत्याधुनिक विविध संशोधन-तंत्रज्ञानांपैकी रोबोटिक्स हे आपणा सर्वांना माहित आहेच पण याच रोबोटिक्सचा भविष्यात दुष्परिणाम कसा होईल व तो तीव्र बनल्यानंतर कोणता विनाश ओढवेल याचे सूचक भस्मासुर या कथेत केले आहे. आपल्या देशातील भ्रष्ट राजकारणी कशाप्रकारे हवामानाच्या अंदाजात फेरबदल करून आपला स्वार्थ साधतात हे ‘वादळ’ कथेत अतिशय नाट्यमयरित्या मांडण्यात आले आहे.


सर्व कथांमधून लेखिकेचा अभ्यास, चिंतन, तर्कशुद्ध विचार आणि बऱ्याच प्रसंगांना भावनांचा लाभलेला स्पर्श, त्यातील भाषा अगदी सोपी असल्याने कथाबीजांना कथा रूपाचा कुशल विस्तार साधता आला आहे. एक एक कथा वाचताना संपेपर्यंत गुंतवून ठेवणारी नाट्यमय रचना, त्यामध्ये असलेलं गूढ, सोबत विज्ञानाची जोड, यामुळे पुस्तक वाचून संपेपर्यंत मी रमून गेलो. त्यामुळेच, हे पुस्तक इतर वाचकांनीही वाचावे असं मी नमूद करेन.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३. Bookmark the permalink.

Leave a comment