प्रवेशपरीक्षा परदेशातील उच्चशिक्षणासाठी- भाग दोन

परदेशात उच्चशिक्षण घेताना: लेख क्रमांक ४

लेखक: प्रथमेश आडविलकर

गेल्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या देशांमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी कोणकोणत्या परीक्षा आवश्यक आहेत ते पाहिले. या भागामध्ये त्या परीक्षांची विस्ताराने माहिती बघू.


जीआरई (Graduate Records Exam) –

जीआरई ही अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये (Graduate Schools) पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी प्रमाणित केली गेलेली परीक्षा आहे. अमेरिकेतील ‘एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस’ या संस्थेकडून ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेमध्ये (तसेच काही इतर देशांमध्येही) व्यवस्थापनाव्यतिरिक्त सर्व विद्याशाखांमधील प्रत्येक विषयाच्या पदव्युत्तर व पीएचडीच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही एकच परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या माध्यमातून परीक्षार्थ्याचे विश्लेषणात्मक कौशल्य, इंग्रजीवरील प्रभुत्व व संख्यात्मक क्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. ही परीक्षा संगणकाच्या सहाय्याने देता येते. मात्र, ज्या ठिकाणी संगणक उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी ती लिखित स्वरूपातदेखील देता येते. या परीक्षेत तीन प्रमुख विभाग आहेत.
अ) इंग्रजीचे ज्ञान (Verbal Reasoning) – या विभागात परीक्षार्थ्याचे इंग्रजीवरील प्रभुत्व जाणून घेतले जाते. हा विभाग अजून दोन उपविभागांमध्ये विभागाला गेला आहे. या प्रत्येक उपविभागात २० प्रश्न असतात व ते सोडवण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ असतो. साधारणपणे प्रश्न शब्द व वाक्यांमधील संबंध, विविध शब्दांमधील सहसंबंध अशा स्वरूपाचे असतात. जीआरईची गुणांकन पद्धत खूप वेगळी आहे. या विभागासाठी किमान १३० तर कमाल १७० गुण असतात. त्यादरम्यान, एकेका गुणाची वाढ होऊ शकते.
ब) गणिती क्षमता (Quantitative Reasoning) – या विभागात परीक्षार्थ्याच्या संख्यात्मक क्षमता म्हणजे गणित व भूमितीमधील मुलभूत कौशल्ये जाणून घेतली जातात. हा विभागही दोन उपविभागांमध्ये विभागाला गेला आहे. इथेही प्रत्येक उपविभागात २० प्रश्न असतात. त्यासाठी एकूण वेळ मात्र ३५ मिनिटे असतो. या विभागाचे गुणांकनही १३०-१७० च्या पातळीवर केले जाते.
क) Analytical Writing – या विभागात परीक्षार्थ्याचे विश्लेषणात्मक कौशल्य तपासले जाते. या विभागात फक्त दोन प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नासाठी अर्ध्या तासाचा वेळ असतो. या विभागाचे गुणांकन ०-६ च्या पातळीत केले जाते. त्यामध्ये अर्ध्या गुणाची वाढ होऊ शकते.
कालावधी: या परीक्षेचा कालावधी एकूण पावणेचार तासांचा आहे. जीआरईचे गुणांकन एकूण पाच वर्षांसाठी वैध असते. जीआरई परीक्षेचे एकूण शुल्क २०५ युएस डॉलर्स आहे. परीक्षार्थी संगणकावरील आधारित जीआरई परीक्षा एका वर्षात कितीही वेळा देऊ शकतो. मात्र सलग दोन परीक्षांमध्ये किमान २१ दिवसांचे अंतर असावे. लिखित जीआरई परीक्षा मात्र वर्षभरात फक्त तीन वेळा देऊ शकतो,तेसुद्धा ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि फेब्रुवारी याच महिन्यांत. परीक्षेचा निकाल लगेचच परीक्षेनंतर समोर दिसतो. अधिकृतरित्या मात्र तो पंधरा ते वीस दिवसांत परीक्षार्थीने दिलेल्या पत्त्यावर येतो. त्यानंतर जीआरईचे गुण थेट विद्यापीठाला न कळवता ETS मार्फत (Educational Testing Service) कळवावे लागतात.

GMAT (Graduate Management Admission Test) –

जीमॅट ही उद्योग व व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी परीक्षा आहे. ही परीक्षा GMAC (Graduate Management Admission Council) या संस्थेकडून घेतली जाते. जगभरातल्या साधारणतः ११४ देशांमध्ये जीमॅट परीक्षा केंद्रे आहेत. जीमॅटबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असलेला गैरसमज म्हणजे उद्योजकीय कौशल्ये व निर्णयक्षमता यांचे पृत्थकरण जीमॅट परीक्षेतून केले जाते. प्रत्यक्षात मात्र या परीक्षेत संख्यात्मक व विश्लेषणात्मक कौशल्य, इंग्रजी इत्यादी तपासले जाते. ही परीक्षा संगणकाच्या सहाय्याने देता येते. जीआरई आणि जीमॅट परीक्षांमध्ये काही विभाग समान आहेत, मात्र त्यांचे गुणांकन आणि उपलब्ध वेळ यामध्ये फरक आहे. या परीक्षेत प्रमुख चार विभाग आहेत.
अ) Analytical Writing Assessment – जीमॅट परीक्षेतील या विभागात जीआरई प्रमाणे परीक्षार्थ्याचे विश्लेषणात्मक कौशल्य तपासले जाते. इथे हे विश्लेषण मात्र युक्तिवादाचे असते. या विभागात एकच प्रश्न असतो व त्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ असतो. या विभागाचे गुणांकन जीआरईसारखेच ०-६ च्या पातळीत केले जाते. त्यामध्ये अर्ध्या गुणाची वाढ होऊ शकते.
ब) Quantitative Reasoning – या विभागात संख्यात्मक ज्ञान, गणित व भूमिती या विषयांचे प्रश्न असतात. विभागात सर्व मिळून ३१ प्रश्न असतात व एकूण वेळ ६२ मिनिटांचा असतो. या विभागाचे गुणांकन ०-६० गुणांच्या पातळीवर केले जाते.
क) Integrated Reasoning – जीमॅट परीक्षेत २०१२ मध्ये हा विभाग समाविष्ट करण्यात आला. या विभागात एकूण १२ प्रश्न असतात व त्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ असतो. या विभागाचे गुणांकन १-८ या पातळीवर असते.
ड) Verbal Reasoning – या विभागात एकूण ३६ प्रश्न असतात. इंग्रजी वाचन व त्यावर आधारित प्रश्न, टीकात्मक विश्लेषण व वाक्यांवर आधारित प्रश्न असे या विभागातील प्रश्नांचे सर्वसाधारणपणे स्वरूप आहे. या विभागासाठी एकूण वेळ ६५ मिनिटांचा असतो. या विभागाचे गुणांकन ०-६० च्या पातळीवर केले जाते.
जीमॅट परीक्षा एकूण तीन तास सात मिनिटांची असते. परीक्षेमध्ये अर्ध्या तासाची सुट्टी दिली जाते. जीमॅटचे गुणांकनदेखील एकूण पाच वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी जीमॅट परीक्षा एका वर्षात कितीही वेळा देऊ शकतो. या परीक्षेचे एकूण शुल्क २५० युएस डॉलर्स आहे.

SAT –

या परीक्षेला पूर्वी Scholastic Aptitude Test (SAT) या नावाने ओळखले जायचे. आता ETS ने या परीक्षेचे नाव बदलून SAT असेच केलेले आहे. ही परीक्षादेखील ‘एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस’ (ETS) या संस्थेकडून घेतली जाते. आपल्याकडील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेत गणित, इंग्रजी व विश्लेषणात्मक लेखन तपासले जाते. तसेच परीक्षेचे एकूण गुणांकन ४००-१६०० गुणांच्या पातळीवर केले जाते. सॅट परीक्षेत प्रामुख्याने खालीलप्रमाणे तीन विभाग आहेत.
अ) Critical Reading (टीकात्मक इंग्रजी वाचन) – या विभागामध्ये तीन उपविभाग असून त्यात विविध प्रकारच्या प्रश्नांची उपलब्धता आढळते. या सर्व उपविभागास मिळून एकूण ६५ मिनिटांचा कालावधी असतो.
ब) Mathematics (गणित) – गणित विभागामध्येही वरील इंग्रजी विभागासारखेच उपविभागांचे व प्रश्नांचे वितरण केलेले आहे.
क) Writing (विश्लेषणात्मक इंग्रजी लेखन) – या विभागात निबंध लेखन व इतर विविध प्रकारचे विश्लेषणात्मक लेखन करणे अपेक्षित आहे.
सॅट परीक्षेचा एकूण कालावधी जीआरईसारखाच पावणेचार तासांचा आहे. सॅटचे गुणांकनदेखील पाच वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी सॅट परीक्षा एका वर्षात सात वेळा देऊ शकतो. या परीक्षेचे एकूण शुल्क परीक्षार्थीच्या नागरिकत्वावर अवलंबून आहे. भारतीय परीक्षार्थींना हे शुल्क साधारणपणे १०० युएस डॉलर्स एवढे आहे.

TOEFL (Test of English as a Foreign Language) –

अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जीआरई किंवा जीमॅटसहित द्यावी लागणारी टोफेल ही इंग्रजीची परीक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशा विद्यार्थ्यांना टोफेल ही परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जीआरई व सॅटसारखी टोफेल ही परीक्षासुद्धा अमेरिकेतील ‘एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस’ या संस्थेकडून घेतली जाते. टोफेल ही इंटरनेट आधारित परीक्षा (iBT-internet Based test) आहे, म्हणून बऱ्याचदा टोफेल परीक्षेचा उल्लेख TOEFL-iBT असाही केला जातो. मात्र, अजूनही ही परीक्षा लिखित स्वरुपातदेखील घेतली जाते. टोफेल ही इंग्रजीची परीक्षा असल्याने तुलनेने जीआरई व जीमॅटपेक्षा सोपी असते. टोफेल परीक्षेत एकूण चार विभाग आहेत. प्रत्येक विभागास ३० गुण आहेत. म्हणजेच एकूण टोफेल ही १२० गुणांची परीक्षा असते.
अ) Reading – या विभागात ३ ते ४ उतारे (Passages) असतात व त्यावर एकूण ३६-५६ विचारलेले प्रश्न असतात. हे उतारे शैक्षणिक विषयांवर आधारित असतात. साधारणपणे कारण-परिणाम किंवा तुलनात्मक विरोधाभास यांसारख्या बाबींची समज असल्यास हे उतारे सहजपणे परीक्षार्थी सोडवू शकतो. या विभागासाठी एकूण वेळ ६० -८० मिनिटांचा असतो. त्याचे गुणांकन ०-३० या पातळीवर केले जाते.
ब) Listening – या विभागामध्ये एकूण सहा ते नऊ उतारे असतात, ज्यात प्रत्येकी पाच ते सहा प्रश्न असतात. या विभागासाठी एक ते दीड तास एवढा वेळ असतो. वरील दोन्ही विभागानंतर मात्र १० मिनिटांचा अनिवार्य विराम असतो.
क) Speaking – या विभागामध्ये एकूण सहा प्रश्न असतात आणि परीक्षार्थीला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना अर्थातच इंग्रजी बोलण्याची सवय असणे अत्यावश्यक आहे. या सहा प्रश्नांची उत्तरे बोलण्यासाठी २० मिनिटांचा वेळ असतो.
ड) Writing – या विभागामध्ये एकूण दोन प्रश्न असतात. एका प्रश्नामध्ये दिलेल्या विषयावर स्वत:ची मते व्यक्त करणारे निबंधलेखन करावयाचे असते आणि दुसऱ्या प्रशामध्ये एक संवाद ऐकून त्यावर आधारित लेखन करणे आवश्यक आहे. या विभागासाठी ५० मिनिटांचा अवधी असतो. या विभागाचेही गुणांकन ०-३० या पातळीवर केले जाते.
टोफेल परीक्षेचा एकूण कालावधी हा सव्वातीन ते सव्वाचार तासांचा असतो. या परीक्षेचे गुणांकन दोन वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी एका वर्षात टोफेल –आयबीटी ही परीक्षा कितीही वेळा देऊ शकतो, मात्र दोन परीक्षांमध्ये किमान १२ दिवसांचे अंतर असणे गरजेचे आहे. या परीक्षेचे एकूण शुल्क १६० ते २५० युएस डॉलर्सच्या दरम्यान आहे. जगभरातील १६५ देशांमध्ये या परीक्षेची साडेचार हजारपेक्षाही जास्त परीक्षा केंद्रे आहेत.

IELTS (International English Language Testing System) –


टोफेलसारखीच ‘आयइएलटीएस’ ही इंग्रजीची परीक्षा आहे. आयइएलटीएस आणि टोफेल या दोन्ही परीक्षांमध्ये बरेच साम्य आहे. मात्र टोफेल परीक्षेला पर्याय म्हणून अनेकदा आयइएलटीएसकडे पाहिले जाते. युरोपातील अनेक देशांमध्ये आयइएलटीएसचे गुण स्वीकारले जातात पण अमेरिकेमध्ये मात्र आयइएलटीएसपेक्षा टोफेल परीक्षेलाच जास्त पसंती दिली जाते. परदेशातील पदव्युत्तर प्रवेशासाठी टोफेलसारखीच आयइएलटीएस परीक्षा ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा इंग्रजी नाही (Non-native English Speakers) अशा विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. आयइएलटीएसमध्ये टोफेलसारखेच चार – Reading, Listening, Speaking, Writing हे विभाग आहेत. या विभागांच्या परीक्षाही टोफेलसारख्याच असतात. इथे गुणांच्याऐवजी या विभागांचे मूल्यांकन बँडस् च्या आधारावर केले जाते. हे बँडस् ०-९ या दरम्यान दिले जातात. आयइएलटीएससाठी एकूण तीन तासांचा वेळ असतो. या परीक्षेचे गुणांकन दोन वर्षांसाठी वैध असते. परीक्षार्थी एका वर्षात ही परीक्षा कितीही वेळा देऊ शकतो. या परीक्षेचे शुल्क १६५ युएस डॉलर्स एवढे आहे.

अभ्यास कसा करावा?


वरील परीक्षा घेणाऱ्या सर्व संस्था स्वत:च या परीक्षांच्या तयारीचे व्यवस्थापन करतात. परीक्षांच्या तयारीसाठी या संस्था पुस्तकांपासून ते सॉफ्टवेअर्सपर्यंत विविध शैक्षणिक उत्पादने बनवतात. जसे की, इटीएस जीआरईच्या तयारीसाठी अधिकृत पॉवरप्रेप नावाचे सॉफ्टवेअर बनवते.

महत्वाचे दुवे :
https://www.ets.org/gre
http://www.mba.com
www.ets.org/toefl
www.ielts.org
sat.collegeboard.org

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged . Bookmark the permalink.

Leave a comment