पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ५०

परीक्षण क्रमांक : ५०

दिनांक: २२जून २०२३

पुस्तकाचे नाव: माझा गाव

लेखक : रणजित देसाई

ग्रंथपेटी क्रमांक: ११

पुस्तक क्रमांक: २४६

परिचयकर्ती: सौ. किरण दीपक

समन्वयिका : सौ. मनीषा कुलकर्णी, करामा

“माझा गाव’ ही कादंबरी पद्मश्री रणजित देसाई’ यांनी लिहीलेली असल्यामुळे सगळ्यांनी वाचायला हवी अशी आहे. कादंबरीतील बरीच पात्रे आणि लेखकांनी रंगवलेले प्रसंग बऱ्याच अंशी वाचकांच्या आयुष्याशी जवळीक साधणारे आहेत. शेवट तर इतका सुंदर केला आहे की, डोळ्यात अश्रू तरळायला लागतात.

सुरुवातीची ५० पाने वाचताना गावाकडचं वर्णन आणि भाषा वाचताना थोड कंटाळा आल्यासारखं झालं , त्यांनंतर मात्र कादंबरीने जी पकड घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. शेवट तर निव्वळ अप्रतिम वाटला.

यांत दोन मित्र आप्पा आणि तात्या यांच्या मैत्रीबद्दल वर्णन केलेलं आहे. आप्पा (गावाचे इनामदार) त्यांचा मोठा मुलगा रावबा, त्याची पत्नी, उमा व लहान मुलगा जयवंत (पाच वर्षांचा व त्याला मातृवियोग झालेला असतो.) नोकर चाकर, वाडा सगळं दृश्य (वाचतांना) हुबेहुब डोळ्यासमोर उभं राहत.त्यांच्या आयुष्यात कसे सुखदुःखाचे (प्रामुख्याने दुःखाचेच) प्रसंग येतात, आणि ते कसे धीराने, एकमेकांच्या मदतीने संकटातून बाहेर येतात, हे वाचायला नव्हे, बघायला मिळते. आप्पांचा जिवलग मित्र आणि व्याही जयवंतराव, यांच्या मैत्री आणि शत्रुत्वाचं वर्णन लेखकांनी फारच सुंदर केलं आहे.

१५ दिवसांपूर्वी हिरवा, शिवाराकडे सजलेल्या पेत्याकडे पाहून हर्षाने बेभान झालेला गाव, पूर आणि ढगातून पडणाऱ्या सरी, गावाच्या डोळ्यातलं पाणी थोपवू शकत नाहीत. बियाणाला देखील भात उरलेला नसतो तेव्हाचा आप्पांचा संवाद,” अरे रडता काय, देवानं दिलं, देवानं नेलं. त्याची मर्जी. ही परीक्षा बघतोय देव.” पेरण्यासाठी जेव्हा भात पाहिजे तेव्हा वाडयातून न्या, असे निक्षून सांगतात आणि आपला पुरा वाडा गावकऱ्यांसाठी रिता करून देतात. घरातील चांदीचे देव, मूर्ती आणि देव्हारा गहाण ठेवायला काढतात, तेव्हाचा संवाद- “देव चांदीच्या देव्हाऱ्यात किंवा मूर्तीतच राहतो असं नाही. तो हौसेचा भाग होता, श्रध्देचा नव्हे. चांदीचा देव्हारा नाही, चांदीची मूर्ती नाही, म्हणून (देव) लक्ष्मी रूसणार नाही. त्याच्या मोहात पडून मी माणुसकी विसरणार नाही.”

असं हे आप्पांच चरित्र. शेवटचा प्रसंग- गावात दरोडा पडतो. आप्पा स्वतः दरोडेखोरांशी चार हात करतांना मृत्यु पावतात, काकींचा (तात्यांची पत्नी) आजारपणामुळे मृत्यु होतो. तात्या जयवंताला सांगतात, गावी निरोप धाड मी जरा आत जाऊन पडतो – आणि ते कायमचेच झोपी जातात.त्यांच्या अंत्ययात्रेला सारा गाव भजन (आम्ही जातो अमुच्या गावा) गात दोघांची अंत्ययात्रा काढतात.

आप्पांच्या मरणाची बातमी ऐकुन यशवंतराव (त्यांचे व्याही) येतात. त्यांना स्वतःच्या अहंकाराचा पश्चाताप होतो. एका वेगळ्या वळणावर कादंबरी संपते.

लेखकांनी खूपच सुंदर पात्रे रंगवलेली आहेत. प्रत्येकाकडून काहीतरी प्रेरणादायी शिकवण मिळते. तो जयवंत असो, तात्या, काकी, आप्पा, उमा किंवा यशवंतराव सगळी पात्रे अगदी एकापेक्षा एक !!!

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment