पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक १२

दिनांक : २८ फेब्रुवारी २०२३

परीक्षण क्रमांक: १२

पुस्तकाचे नाव: दुहेरी शाप

लेखिका: कौसल्या बैसंत्री

अनुवाद: डॉ. उमा दादेगावकर

पुस्तक क्रमांक: १०६०

पेटी क्रमांक : ३३

परिचयकर्ती : उज्वला वागळे

समन्वयिका : सुमेधा बेलगावकर

कौसल्या बैसंत्री ह्यांचं दुहेरी शाप हे पुस्तक स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्यांनी नक्कीच वाचण्यासारखं आहे. हे चरित्र म्हणजे इतिहासातील एका वैशिष्टपूर्ण कालखंडाचं चित्रण आहे. अस्पृश्य समाज, त्यांचे प्रश्न आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कौसल्याबाईंनी दिलेली झुंज ह्याचं वर्णन त्यात आहे. खरं तर ह्या चरित्राची नायिका मला लेखिकेची आई वाटते. ती स्वयंप्रेरणा असलेली बाई होती आणि मुलांना शिक्षण देण्याच्या ध्येयाने प्रेरित झाली होती. वाटेत येणाऱ्या शेकडो अडचणींना तोंड देत तिने मार्ग काढला आणि मुलींना शिकवून चांगल्या मार्गी लावलं. कौसल्याबाईंना आत्मभान होते तसेच लग्नानंतर होणाऱ्या अन्यायाची जाणीवही होती. पण लग्नापूर्वीच्या चळवळीचा अनुभव असूनसुद्धा परिस्थितीला झुंज न देता त्यांनी तडजोड का केली हे आपल्याला शेवटपर्यंत लक्षात येत नाही. कदाचित यामध्ये आर्थिक स्वातंत्र्याचा अभाव आणि मुलांसाठी संसारात जुळवून घेणं इत्यादी गोष्टींमुळे आलेला हतबलपणा कारणीभूत होता. सुशिक्षित असूनही शासकीय योजनांचा स्वतःसाठी फायदा न घेतल्याचा तोटा त्यांना अन्यायाच्या आणि आर्थिक पारतंत्र्याच्या स्वरूपात सहन करावा लागला. आपल्या मुलांच्या मदतीने शेवटी त्यांनी घटस्फोट घेतला. लढवय्या असलेल्या या चरित्रनायिकेचा हा असा असामान्य ते सामान्य प्रवास पुस्तकातील वर्णनाप्रमाणे खरंच ‘शापित’ वाटत राहतो. पुस्तकातील अनेक प्रसंग जिवंत वाटतात. भाषांतर किंवा अनुवाद खूप चांगला केल्यामुळे खरेतर हिंदी भाषेतील पुस्तक असूनही मूळ मराठी भाषेतीलच वाटते. अनुवादाचा जो ओघ आहे त्यामुळे हे पुस्तक एका बैठकीत वाचलं जातं. एक वेगळा अनुभव म्हणून वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावे.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , . Bookmark the permalink.

Leave a comment