पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ३७

परीक्षण क्रमांक: ३७

दिनांक: १४ मे २०२३

पुस्तकाचे नाव: खिडक्या

लेखिका: सानिया (सुनंदा कुलकर्णी)

ग्रंथपेटी क्रमांक: २१

पुस्तक क्रमांक: ५२१

परिचयकर्ती : सौ. डॉ. सीमा उपाध्ये

समन्वयक: डॉ. नितीन उपाध्ये

ग्रंथपेटीमध्ये एखादं पुस्तक हिंदी भाषेतून अनुवादित झालेले आहे का हे शोधण्याकरता लेखकांची नावे यादीमध्ये तपासत असताना ‘सानिया’ हे नाव डोळ्यासमोर आले. क्षणभर वाटले, सानिया मिर्झाची आत्मकथा किंवा आत्मचरित्र असेल म्हणून उत्सुकतेने “खिडक्या” हे पुस्तक वाचायला घेतले. पण नंतर लक्षात आले की हे पुस्तक सानिया मिर्झाने लिहिले नसून “सानिया” या टोपणनावाने लेखन करणाऱ्या ‘सुनंदा कुलकर्णी’ यांचे आहे.

खिडक्या ह्या पुस्तकामध्ये एकूण बारा कथा आहेत. माणसांमधल्या निरनिराळ्या नातेसंबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुमच्या-आमच्यासारख्या लोकांच्या या कथा आहेत. प्रत्येक कथा म्हणजे मनाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात दडलेल्या भावनांना डोकावून बघण्याकरता असलेली एक खिडकी आहे. लेखिका एकेक करत हळुवारपणे या ‘खिडक्या’ आपल्यासमोर उघडत जाते. कथासंग्रहातील या कथा वाचताना ‘सानियां’चं लेखन हे काळाच्या पुढचं आहे या गोष्टीची सतत प्रचिती येत राहते.

सर्वसाधारणपणे जेंव्हा आपण एखादी कथा वाचतो तेंव्हा आपण पात्रांना चांगल्या किंवा वाईट ह्या दोनच चौकटीत बसवतो. मात्र, प्रत्येक पात्राची या दोन्ही चौकटींशिवाय एक वेगळी बाजू असू शकते हे आपल्या ध्यानातच येत नाही. लेखिका इथे आपल्यासमोर ती बाजू मांडत प्रत्येक पात्राला योग्य तो न्याय देण्यात सफल यशस्वी झालेल्या आहेत.

या कथासंग्रहातील कथा नेहमीप्रमाणे सुरू होते, पण नंतर अश्या एका वळणावर वाचकाला घेवून जाते की त्याला प्रत्येक पात्र कळत असूनही पूर्णपणे अनोळखीच वाटत राहते. कथेचा शेवट नाट्यमय न होता साधारणपणेच होतो, तरी तो मनाला चटका लावून जातो. कारण प्रत्येक कथा वाचताना हे आपल्या बरोबरही घडले आहे किंवा कित्येक वेळा आपणही असेच वागलो आहोत हे प्रकर्षाने जाणवते. कारण ह्या कथा फक्त नवराबायकोच्या किंवा प्रेमी-प्रेमिकांच्या नाहीत तर मित्र-मैत्रीण, आई-मुलगी, बहीण- भाऊ यांसारख्या विविध नात्यांमधील भावनिक बंध दाखवणाऱ्या आहेत.

‘चाफा’ ह्या कथेचा नायक ‘रत्नाकर’ जेव्हा हा विचार करतो की ‘शेवटी काय, जगणे महत्वाचे ! पैसा मिळवणे आणि जगणे ! नोकरी करणे आणि जगणे ! प्रेम नाही केले तरी चालते’ तेव्हा जीवनाचे सत्य डोळ्यापुढे आले तरी मनात दडलेला चाफ्याचा सुवास जणू त्याच्या मनातून काही बाहेर जात नाही. ‘हिवाळ्यातला पहिला दिवस’ ह्या कथेतले प्रोफेसर बर्वे म्हणजे आपणच तर नाही ना? ही रुखरुख मनात कित्येकदा येऊन जाते. प्रत्येक गोष्ट शिस्तबद्ध करण्याच्या मराठी माणसाच्या सवयीला एक टपली मारून गेल्यासारखी ही कथा वाटते. ‘शिल्लक’ ह्या कथेत नायिका कस्तूरी आणि नायक संतोष ह्या ठिपक्यांची कधी एक सरळ रेषा बनते, कधी त्रिभुज तयार होते आणि कधी एक न संपणारे वर्तुळ…आणि शेवटी काय शिल्लक राहते हेच ह्या कथेचे वैशिष्ट्य. पुस्तकाचे शीर्षक असणारी कथा वाचायची मला नेहमीच उत्सुकता असते आणि म्हणूनच ‘खिडक्या’ ही कथा वाचताना एक वेगळीच उत्सुकता होती आणि नावाप्रमाणेच जयंती आणि सुमा ह्या मायलेकीच्या मनातल्या अनुक्रमे त्यांच्या पती आणि पिता असलेल्या ‘पद्मनाभ’ या व्यक्तिरेखे बद्दलच्या भावना कशा वेगवेगळे रूप घेत असतात ह्याचे सुंदर लेखन लेखिकेने केले आहे. एकंदर कथासंग्रहातील सर्वच कथा उत्तम आहेत.

कमीत कमी शब्दांचा वापर करून लिहिलेल्या या कथा अप्रतिम आहेत. प्रत्येक कथेमधे आपण एखाद्या ठाम निष्कर्षाला येऊन पोहोचतच नाही, हे ह्या कथांचे वैशिष्ट्य. मानवी जीवनही असेच आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे कोड़े सुटत नाही. प्रत्येकाने ते आपापल्या अनुभवाने सोडवावे लागते. कदाचित कथासंग्रहातील कथांचे हेच उद्दिष्ट असावे.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment