पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ३४

परीक्षण क्रमांक : ३४

दिनांक: ५ मे २०२३

पुस्तकाचे नाव: जांभळाचे दिवस

लेखक : व्यंकटेश माडगूळकर

ग्रंथपेटी क्रमांक:

पुस्तक क्रमांक: ९३

परीचयकर्ती आणि समन्वयिका : सौ. श्वेता पोरवाल, Mankhool

दहा ललित कथांचा हा संग्रह हातात घेतल्याबरोबर पूर्ण वाचून काढावासा वाटला. त्यावरूनच लेखकाची शब्दांवरील पकड जाणवली. ‘ जांभळाचे दिवस’ मध्ये मे महिन्याच्या सुट्टीत गावी आलेला यंका, जांभळे तोडताना चमनला भेटतो आणि तिच्या सुख दुःखाच्या गोष्टी जांभळं तोडताना ऐकत राहतो. जांभळाचे दिवस लवकर सरले तरी ह्या जांभूळल्या आठवणी मात्र विसरल्या जात नाहीत.

‘पंच्याण्णव पौंडांची मुलगी’ केवळ महादेवाच्याच नाही तर आपल्याही मनाचा ठाव घेते. त्या मुलीचा अल्लडपणापासून ते आईपणापर्यंतचा प्रवास आणि ते पाहताना महादेवात होत जाणारे बदल आपणही उत्सुकतेने वाचत राहतो. कथेचा शेवट तर अगदीच मनात घर करून राहतो.महादेव किती अपेक्षाविरहित अलिप्तपणे त्या मुलीत गुंतत जातो हे त्यालाही कळत नाही.

‘उतारावर ‘ ..किती अर्थगर्भित कथाशिर्षक! टेकडीवर फिरायला छाती पुढे काढून आणि मान ताठ करून निघालेले वामनराव उतरताना मात्र आपण थकलो याची जाणिव होऊन परतीला निघतात. कसल्या उतारावर असतात ते..टेकडीच्या, वयाच्या की मानसिक शक्तीच्या ?

‘ अनवाणी ‘ पोस्टमनच्या पाय पोळण्याची झळ, छोट्या पण पायाने अधू असलेली बेबी अनुभवते आणि त्याच्याकडे नसलेल्या वहाणा त्याला शिमग्याची पोस्त म्हणून देते. तिच्या त्या कनवाळूपणाची उतराई म्हणून तिला नसलेले पाय देण्यास त्याची असमर्थता तिच्याकडे बदलणाऱ्या पोस्टमन चे गुपित सांगून जाते.

‘लोणी आणि विस्तू ‘ मधल्या रघुला आपण चिंगीला मनातलं सांगायला उशीर केला हे सखुबाईच्या ‘विस्तवाजवळ लोणी आल की वितळणारच ‘ , हे तिच्या गावठी पण अनुभवी बोलांमधून कळत. कथेची मांडणी करताना लेखकाने एका अदृश्य वर्तुळाची मांडणी केली आहे ती निव्वळ अप्रतिम आहे.

‘ शाळातपासणी ‘ करण्यासाठी निघालेल्या ए. ओ. ला काय काय अनुभवांना सामोरे जावे लागते हे वाचताना हसू फुटते. कथेचा शेवट तर अगदीच त्यावर कडी करणारा आहे.

‘ बाई ‘ ज्या कोषातून बाहेर पडतात, त्याच कोषात पुन्हा लवकरच अलगदपणे जातात. काय हवं होत, हवं ते मिळालं की नाही याची उत्तर मिळवण्याचा फार विचार न करता आहे तस आयुष्य जगत राहतात.

‘ बाजाराची वाट ‘ चालताना वंचा नाईलाजाने सुखाची सोबत घेते आणि नकळतपणे त्याला स्वतःच्या सुखदुःखाचाही सोबती करते.

‘ सकाळची पाहुणी ‘ एक सुरेख फॅण्टसी आहे. सत्य आणि आभासाचा लपंडाव वाटावा अशा तऱ्हेने लिहिलेली कथा!

‘ सायकल ‘ सारखी वस्तू मास्तरांना परवडत नसताना ते मुलासाठी घेतात पण तीच सायकल हरवल्यानंतर मात्र ते शांतपणे न रागवता मुलाची समजून घालतात. न रागवण्याच कारण केवळ त्यांनाच माहिती असत !जांभूळ कस आपली आठवण म्हणून त्याचा जांभळा रंग जिभेवर सोडून जात, तसच काहीसं ‘ जांभळाचे दिवस ‘ आपला ठसा वाचकांच्या मनावर उमटवून जात.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment