पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ७६

परीक्षण क्रमांक : ७६

दिनांक: १५ ऑगस्ट २०२३

पुस्तकाचे नाव: एक पूर्ण – अपूर्ण

लेखिका : सौ नीला सत्यनारायण

ग्रंथपेटी क्रमांक: १८

पुस्तक क्रमांक: ४३७

परीचयकर्ता : श्री संजय देशपांडे

समन्वयिका : सौ.स्नेहल देशपांडे, इंटरनॅशनल सिटी, दुबई.

नीला सत्यनारायण यांचं माझ्या वाचण्यातील हे दुसरं पुस्तक. जाळरेषा ह्या पुस्तकात त्यांचा IAS ऑफिसर असतानाचा खडतर प्रवास नमूद केला आहे. एक पूर्ण -अपूर्ण हे त्यांच्या मतिमंद मुलाविषयीच्या संगोपनाची गाथा आहे. मुलाला वाढवताना त्यांना कोणत्या दिव्यातून जावं लागलं ह्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे.

आपल्याला संपूर्ण पुस्तकात नकारात्मक व्यक्ती आणि प्रसंगाबद्दल वाचावे लागते ह्या गोष्टीचा खुलासा त्यांनी शेवटी केला आहे. सर्वप्रथम आपला मुलगा चैतन्य हा मतिमंद आहे हे त्यांना स्वीकारणे खूपच कठीण गेले. त्याच्या आकलनशक्तीनुसार त्याची वाढ व्हायला हवी, ही वस्तुस्थिती बऱ्याच पालकांप्रमाणे त्यांना देखील स्वीकारण्यात कठीण गेली.

आपल्याकडे समाज अशा प्रकारच्या लोकांना सहजपणे सामावून घेत नाही आणि त्यातूनच पालकांना एक नैराश्याची भावना निर्माण होते.चैतन्यच्या संगोपनाच्या बाबतीत आलेले बऱ्यापैकी वाईट अनुभव आपल्याला नक्कीच हादरवून सोडतात. डॉक्टरांनी त्याची आशा सोडावयासच सांगितली. त्यावर जिद्दीने मात करत त्यांनी डॉक्टरांचे भाकीत खोटे ठरवले. आपले शासकीय पद जाबदारीने सांभाळून मुलाची वाढ करणे नक्कीच अशक्यप्राय होते. त्यांची पहिली मुलगी अनुराधा हिला देखील आई म्हणून न्याय देणे देखील तितकेच जिकिरीचे होते. आपले पती सत्यनारायण यांची चांगली साथ लाभली ह्याचा त्या आवर्जून उल्लेख करतात.

चैतन्यचा वाढीचा प्रवास, त्यासाठी केलेली अथक मेहनत, आणि कालांतराने सत्य स्वीकारून त्यांच्या स्वतःत झालेला बदल हा नक्कीच चैतन्यच्या दृष्टीने खूपच उपयुक्त ठरला.मतिमंद मुलांबद्दल केवळ करुणा किंवा कीव दाखवण्यापेक्षा त्यांना एक माणूस म्हणून स्वीकारणं किती गरजेचे आहे हे आपल्याला नक्कीच जाणवते. आपल्या मुलांनी सक्षम व्हावे, ह्यासाठी केलेली साधना नक्कीच इतरांनाही प्रेरणादायी ठरू शकेल ह्यात काहीच संदेह नाही. एक कुशल शासकीय अधीकारी, कवयित्री, लेखिका अशा हरहुन्नरी असण्याऱ्या नीला सत्यनारायण दुर्दैवाने करॊनाच्या काळात निधन पावल्या. परंतु आपल्या जीवनात त्यांनी केलेली भरीव कामगिरी आपल्या नक्कीच लक्षात राहील.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , , . Bookmark the permalink.

Leave a comment