पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ६०


परीक्षण क्रमांक : ६०

दिनांक : १७ जुलै २०२३

पुस्तकाचे नाव: पाखरमाया

लेखक: मारुती चितमपल्ली

ग्रंथपेटी क्रमांक: १४

पुस्तक क्रमांक: ३३०

परीचयकर्ता: डॉ. प्रताप बोर्डवेकर

समन्वयिका: निलम नांदेडकर, फुजैराह

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली हे नुसतेच एक लेखक नाहीत ते एक असामान्य व्यक्तिमत्व आहे . म्हटलं तर ते वन्यजीव शास्त्रज्ञ आहेत . महाराष्ट्र शासनाच्या कर्नाळा, नवेगाव, नागझिरा, मेळघाट या अभयारण्यातून त्यांनी आयुष्यभर नुसतच काम नव्हे, तर भरीव योगदान दिल आहे . परंतु त्याहीपलीकडे त्यांची ओळख आहे . पारंपरिक संस्कृत साहित्य , जर्मन आणि रशियन भाषा याबरोबर अरण्यात असताना वेद, उपनिषदे, प्राचीन वन्य जीव शास्त्रावरच्या ग्रंथांचे सखोल ज्ञान , जगभरातल्या या विषयातल्या सर्व साहित्याचा ग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला आहे . ते विख्यात पक्षीतज्ञ आहेत . प्राचीन भारतीय ते अर्वाचीन युरोप, चीन, जपान इथले वन्य जीवन शास्त्र व साहित्य याचा सहज उल्लेख त्यांच्या पुस्तकातून येतो आणि त्यांच अफाट ज्ञान साधना बघून आपण चक्क अवाक होतो.


त्यांच्या या अथांग ज्ञानाचा आवाका इथे घेतलं केवळ अशक्य आहे म्हणून मला ते अरण्य ऋषी किंवा वन तपस्वी वाटतात . एक आश्रमात ऋषीबरोबर काही काळ राहावे तसे मला त्यांचे कुठेलेही पुस्तक वाचताना वाटते . त्यांच्या पुस्तकात एवढी विलक्षण बारकाई असते की ते आपल्याला हात धरून वनाची सफर घडवत आहेत असेच वाटते . म्हणूनच ते माझे सर्वात आवडते लेखक आहेत.


नुकतेच पाखरमाया हे पुस्तक मी पुन्हा एकदा अनेक वर्षांनी वाचले . माझ्या आयुष्यात जंगल म्हणजे एकच , सिमेंट काँक्रीटचे, ते म्हणजे मुंबई . कधी कोकणातल्या जंगलात गेलो तर आजीच्या गोष्टींमधली भूत खेत देवचर साप विंचू हेच डोळ्यासमोर दिसायचे. वन्य अनुभव कथन हा विषय तसा जड पण त्यांची विलक्षण शैली आपल्या डोळ्या समोर जिवंत चित्र उभे करते.


पाखरमाया या पुस्तकात त्यांनी काजवे, वानर ,बेडूक, कीटक, खेकडे यांच्याबद्दल आपल्याला माहित नसलेल्या अनेक अदभूत गोष्टी आपल्या अनुभवातून मांडल्यात. ती गुपितं मी इथे फोडत नाहीत, ते तुम्ही वाचायालाच हवे. वृक्ष, सुरुची बन, पिंपळ याच बरोबर आणि आकाशचं सौंदर्य यावर सुद्धा लेख आहेत.


शेवटी निसर्ग आणि योगसिद्धी हा लेख म्हणजे चेरी ऑन टॉप आहे . या अद्भुत गोष्टींमुळे पुस्तक वाचून संपेपर्यंत हातातून खाली ठेववत नाही . प्रत्येकाने आवर्जून वाचावे, तनाने नाही तर मनाने तरी जंगलाची सफर चितमपल्ली यांच्यासोबत नक्की घडवावी.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment