पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक ८०

परीक्षण क्रमांक : ८०

दिनांक: १५ ऑगस्ट २०२३

पुस्तकाचे नाव: अनंत माझी ध्येयासक्ती

लेखिका : सुमेधा महाजन

अनुवाद: आश्लेषा गोरे

ग्रंथपेटी क्रमांक: तरुणाई ४

पुस्तक क्रमांक: ८२

परीचयकर्ती आणि समन्वयिका : सौ. श्वेता पोरवाल, Mankhool

एक अशी मुलगी, जिला लहानपणापासून दम्याचा त्रास होता, जिला सततच्या खोकल्यामुळे शाळेत इतर मुलांच्या चिडवण्याला सामोरे जावे लागत होते, जी तरुणपणात साईज झिरोच्या वेडामुळे कमी खाऊन अतिशय अशक्त झाली होती , ती जिद्दीने १५०० किलोमीटरचा पल्ला ३० दिवसात इतर पाच पुरुषांच्या बरोबरीने पूर्ण करते. अशा अत्यंत साहसी आणि खंबीर मुलीची ही कहाणी!!

दम्यामुळे लेखिकेला वारंवार इस्पितळात भरती करावे लागत होते. जशी थंडी वाढेल तशी तिची अवस्था बिकट होत होती. शेवटी तिने स्वतःच प्रकृतीची काळजी घेण्याचे ठरवले आणि त्याविषयी डॉक्टरांशी चर्चा करून व अधिक वाचन करून जो उपाय मिळवला तो म्हणजे व्यायाम! व्यायामासाठी म्हणून पळण सुरू केलं, त्यातही अनेक अडचणींना सामोरे जात मॅरेथॉन पर्यंत मजल मारली. त्यातूनच २०१२ साली एक नवीन संधी समोर आली, ग्रीनेथॉनची!! मिलिंद सोमण आणि इतर चार पुरुषांसह दिल्ली ते मुंबई हे १५०० किलोमीटर अंतर ३० दिवसात पळून गाठायचे. याबद्दल कोणालाही पैसे मिळणार नव्हते तर त्यांनाच पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करून निधी गोळा करायचा होता.

“पळताना फक्त पायांचाच नाही तर डोक्याचाही वापर कर. पळता आलं नाही तर चाल आणि चालताही आलं नाही तर रांगत ये, पण ठरलेलं अंतर पूर्ण कर आणि मगच घरी ये, नाही तर येऊ नकोस!” सुरुवातीला लेकीला विरोध करणारे बाबांनी, लेखिकेला अशा शब्दात प्रोत्साहित केले.

पळण्याच्या पहिल्याच दिवशी अकल्पितपणे पाळी सुरू झाल्याने रस्त्यावर नवऱ्याच्या आडोशाच्या मदतीने स्वतःला स्वच्छ करून परतणारी सुमेधा जरी शरमेने रडत असली तरी दुसऱ्याच दिवशी पुन्हा नव्या जोशाने धावण्यासाठी सज्ज होते. त्यानंतरही प्रदूषणामुळे येणारे दम्याचा अटॅक्स, धावताना होणाऱ्या कपड्याच्या घर्षणामुळे त्वचेला झालेली दुखापत , पोटदुखी अशा अनेक अडचणीवर मात करत ही दौड लेखिकेने पूर्ण केली. ह्या दरम्यान जशी लेखिका स्वतःच्या चुकांमधून / अनुभवांतून शिकत गेली, तसेच आपल्यालाही ते वाचताना बरच काही गवसत.

प्रस्तुत पुस्तक Miles to run before I sleep या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. आश्लेषा गोरे यांनी हे मराठी पुस्तक मूळ वाटावं इतक्या ओघवत्या भाषेत अनुवाद केलेला आहे. अत्यंत प्रेरणादायी असे हे पुस्तक सर्वांनीच विशेषतः मुलींनी आणि स्त्रियांनी नक्की वाचावे.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment