परदेशात शिक्षणाचा खर्च

परदेशात उच्चशिक्षण घेताना: लेख क्रमांक ८

लेखक: प्रथमेश आडविलकर

परदेशात उच्चशिक्षणासाठी जायची तयारी विद्यार्थी करत असताना त्याला सर्वात जास्त काळजी असते ती म्हणजे शिक्षणाच्या एकूण खर्चाची. मात्र परदेशात उच्चशिक्षणासाठी जाण्यापूर्वी थोडा गृहपाठ केल्यावर असे लक्षात येते की शिक्षण शुल्कातील कपात (ट्युशन वेव्हर), शिष्यवृत्ती वा एखादी पाठ्यवृत्ती किंवा ऑन कॅम्पस जॉब मिळाल्यावर एकूण खर्चापैकी बराच खर्च कमी होऊ शकतो. आजच्या या लेखामध्ये या सर्व बाबींबद्दल चर्चा करू. आजच्या लेखात दिलेले खर्चाचे किंवा इतर कोणतेही आर्थिक आकडे ढोबळमानाने दिलेले आहेत. ते अर्थातच विद्यापीठ, देश, राहणीमान, महागाई दर इत्यादी विविध निकषांनुसार बदलू शकतात.

परदेशी शिक्षणाचा खर्च
एमएस किंवा एमबीए सारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी परदेशी शिक्षणादरम्यान होणाऱ्या एकूण खर्चाची विभागणी ढोबळमानाने ट्युशन फी (शैक्षणिक शुल्क) व इतर बाबी अशा दोन गटांमध्ये करता येईल. बहुतांश परदेशी विद्यापीठांचे केवळ शैक्षणिक शुल्कच जवळपास नऊ हजार डॉलर्स पासून ३० हजार डॉलर्सपर्यंत आहे. (अर्थातच प्रत्येक देश व विद्यापीठांनुसार ही रक्कम वेगवेगळी असू शकते) याव्यतिरिक्त विद्यार्थ्याच्या निवास-भोजन व तत्सम आवश्यक खर्चाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे महिन्याला ३५० ते ४५० डॉलर्स इतका खर्च होऊ शकतो. ( ही रक्कम देखील प्रत्येक देश व विद्यापीठ कोणत्या ठिकाणी वसलेले आहे त्या प्रमाणे वेगवेगळी असू शकते). साधारणपणे ४०००० डॉलर्स प्रतिवर्ष इतका खर्चाची तयारी विद्यार्थ्याने करावी.

आर्थिक मदतीबद्दल
परदेशातील शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला शिष्यवृत्ती किंवा एखादी पाठ्यवृत्ती तरी मिळावी अशी इच्छा असते. कारण त्यामध्ये मग ट्युशन फी भरता येते व त्याबरोबरच तिथल्या वास्तव्याचा व खर्चाचा प्रश्न निकाली निघतो. अमेरिकेमध्ये मात्र आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता खूप कमी असते. मात्र विद्यार्थ्याला ‘ट्युशन फी वेव्हर’ म्हणजेच ट्युशन फीमधून मुक्तता मिळू शकते. मग आर्थिक प्रश्न कसा सोडवायचा? अमेरिकेतील प्रत्येक विद्यापीठाला तेथील औद्योगिक क्षेत्राचे मोठे पाठबळ मिळत असते. त्या पाठबळावर विद्यापीठ जमेल तेवढ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्याकडील ‘कमवा आणि शिका’ योजनेसारखे त्या विद्यापीठाच्या आवारात अर्धवेळ काम (Part time job) करण्याची मुभा देते. ही कामे विद्यापीठाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, ग्रंथालयातील पुस्तकांच्या कामापासून ते कनिष्ठ विद्यार्थ्यांना एखादा विषय शिकवण्यासारखी ही कामे असतात. अमेरिकतल्या विसा नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यात एकूण वीस तास काम करण्याची परवानगी मिळते. हाच नियम जर्मनी व युकेमध्येही लागू आहे. सुट्टीमध्ये तर विद्यार्थी या तिन्ही देशांमध्ये पूर्णवेळ काम करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम असेल त्यांना रिसर्च असिस्टंट (RA) तर काही विद्यार्थ्यांना टीचिंग असिस्टंट (TA) म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी त्यांना उत्तम वेतनही दिले जाते. कोणतेही अर्धवेळ काम असो, विद्यार्थ्याला त्या शहराच्या खर्चानुसार किमान मासिक वेतन मिळावे एवढी काळजी विद्यापीठाने घेतलेली असते. जर्मनी व युकेमध्ये साधारणपणे एका तासाला सहा ते सात युरो एवढ्या दराने विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन दिले जाते. ‘ट्युशन फी वेव्हर’साठी विद्यार्थ्याने विद्यापीठाचे निकष वेबसाईटवर तपासावेत. तसेच विद्यापीठाकडून दिले जाणारे अर्धवेळ काम हे गृहीत धरू नये. कारण हे काम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दिले जाते. तसेच विद्यापीठाकडून मिळणारे अर्धवेळ काम, असिस्टंटशिप किंवा शिष्यवृत्ती ह्या सर्व गोष्टी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असतात.

विद्यापीठ आणि औद्योगिक क्षेत्राचा समन्वय
परदेशामध्ये विद्यापीठे आणि औद्योगिक क्षेत्र एकमेकांशी संयुक्तपणे उपक्रम राबवत असतात. यामुळे विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळत असते. तर औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेली पेटंन्ट मिळवून देण्याचे काम विद्यापीठे करत असतात. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र विद्यापीठांना आर्थिक पुरवठा करते आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. विद्यार्थ्यांची शैक्षणिक खर्चामध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात बचत होत असते. संशोधन करणाऱ्या संशोधकांना विद्यार्थी मदत करून आर्थिक मदत मिळवू शकतात. तसेच शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधीही उपलब्ध असते. आर्थिक निधी मदत म्हणून मिळवायची असेल तर विद्यापीठांना खुप आधीच नोंदणी करून कळवण्याची गरज आहे.

भारतीय शिष्यवृत्ती
परदेशी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संस्थाही शिष्यवृत्त्या देत असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना घेता येतो. त्यामध्ये टाटा इंडोमेंट शिष्यवृत्ती, इनलॅक्स शिष्यवृत्ती, केसी महिंद्रा शिष्यवृत्ती, आगा खान इंटरनॅशनल शिष्यवृत्ती, ब्रिटीश काउन्सील, रोटरी शिष्यवृत्ती, आरडी सेठना आणि लोटस ट्रस्ट यांसारख्या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी मदत मिळते.

शैक्षणिक खर्च कमी करण्यासाठी याशिवाय काही इतर मार्गही आहेत. त्या पर्यायांबद्दल पुढील भागामध्ये माहिती पाहू.

This entry was posted in परदेशातील उच्चशिक्षण, स्वरचित and tagged . Bookmark the permalink.

Leave a comment