परदेशी विद्यापीठे आणि विविध सोयी

परदेशात उच्चशिक्षण घेताना: लेख क्रमांक १३

लेखक: प्रथमेश आडविलकर

परदेशी विद्यापीठांकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, निवास व भोजन सुविधा विविध निकषांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अभ्यासेतर उपक्रम व तत्सम वातावरण नेहमीच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण वाढीसाठी पोषक ठरते. या इतर सुविधाही विद्यापीठाची निवड करताना लक्षात घेणे उचित ठरते. या लेखामध्ये परदेशी विद्यापीठांकडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा आढावा घेऊ.

१) निवासी व्यवस्था:
बहुतांश विद्यापीठांमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा वा वसतिगृहे उपलब्ध असतात. निवासी व्यवस्थेची रचना विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार केलेली असते म्हणजे विद्यापीठाच्या आवारात व आवाराबाहेर मात्र विद्यापीठाजवळ, विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या गरजांनुसार ही सुविधा बहाल करण्यात येते. काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना शहराच्या इतर भागांमध्ये असलेल्या त्यांच्या निवासापासून मोफत वाहतूक सुविधा करून देण्यात आलेली असते. प्रत्येक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली असते. सिंगापूरमधील एनएसयू विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच वसतिगृहांची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय या विद्यापीठाच्या वसतिगृह आणि हॉल्स ऑफ रेसिडेन्सेस यांदरम्यान विद्यार्थ्यांसाठी सहा हजारांहूनही अधिक निवासस्थानांची सुविधा उपलब्ध केलेली आहे. अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापीठ एक महत्वाची आयव्ही लीग संस्था असल्याने पदवीच्या चार वर्षांच्या कालावधीदरम्यान सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या सोयीची हमी विद्यापीठाकडून दिली जाते. जपानमधील टोक्यो विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी लघुकालीन व दीर्घकालीन अशा दोन प्रकारे निवासाची सोय केलेली आहे. विद्यापीठाचे यासाठी हौसिंग ऑफिस हे स्वतंत्रपणे कार्यरत असून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी जपानमध्ये सुरक्षित वावरत यावे यासाठी ते कटिबद्ध आहे.


२) ग्रंथालय:
बहुतांश परदेशी विद्यापीठांमध्ये विद्याशाखांनुसार वा विषयांनुसार स्वतंत्र अत्याधुनिक ग्रंथालये आहेत. काही विद्यापीठांचे स्वत:चे प्रकाशनगृह आहेत. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाचे एकच मुख्य आणि अद्ययावत ग्रंथालय आहे. २०१४ च्या संदर्भानुसार या ग्रंथालयात ९३ लाख पुस्तके असून त्यातील तीन लाख पुस्तके ही अतिशय दुर्मिळ आहेत. ‘केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस’ हे जगातील सर्वात जुने असलेले प्रकाशनगृह खरेतर केम्ब्रिज विद्यापीठाद्वारे कार्यरत असलेला एक स्वतंत्र विभाग आहे. हे नामांकित प्रकाशनगृह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विद्यापीठ प्रकाशनगृह आहे. केंब्रिजच्या ग्रंथालयांमध्ये एकूण पंधरा दशलक्ष पुस्तके आहेत. शिकागो विद्यापीठाचेदेखील स्वत:चे स्वतंत्र प्रकाशनगृह आहे. शिकागो युनिव्हर्सिटी प्रेस हे अमेरिकेतील सर्वात मोठे विद्यापीठ प्रकाशनगृह आहे. लंडनमधील यूसीएल विद्यापीठाचे यूसीएल प्रेस हे स्वतंत्र प्रकाशनगृह आहे. यूसीएल विद्यापीठाच्या यूसीएल बिझनेस, यूसीएल कन्सल्टंट या प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार सेवादेखील सशुल्क उपलब्ध आहेत.

३) विद्यापीठांचे कॅम्पस व इमारती:
परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पस व कॅम्पसमधील इमारती व इतर विविध वास्तूंचा अपंग विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून विचार करण्यात आला आहे. बहुतांश विद्यापीठांमधील संशोधन प्रयोगशाळा अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज आहेत. काही विद्यापीठांतील विभागांनी ठराविक क्षेत्रातील नामवंत संशोधन संस्थांशी स्वत:ला संलग्न करून घेतले आहे तर काही विद्यापीठांच्या आवारातच संशोधन संस्थांची केंद्रे आहेत. कॅल्टेक विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जेट प्रपल्षण लॅबोरेटरी व एफएफआरडीसी ही नासाची दोन संशोधन केंद्र आहेत. शिकागोच्या भौतिकशास्त्र विभाग आणि मेट लॅबने द्वितीय विश्वयुद्धाच्या मॅनहॅटन प्रकल्प प्रयत्नांचा मुख्य भाग असलेल्या व जगातील प्रथम अनुविभाजन क्रिया (शिकागो पाइल -1) विकसित करण्यात मदत केली. याच विद्यापीठाच्या संशोधन प्रयत्नांमध्ये फर्मि नॅशनल एक्सीलरेटर प्रयोगशाळा आणि आर्गोन नॅशनल लेबोरेटरी तसेच मरीन बायोलॉजिकल प्रयोगशाळेचे व्यवस्थापन इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.

४) हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा:
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व ठराविक वैद्यकीय सुविधा विद्यापीठाकडून काही अटींवर दिल्या जातात. काही विद्यापीठांच्या कॅम्पसमध्येही मोठी हॉस्पिटल्स आहेत. जपानमधील टोक्यो विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यापीठाचे स्वतंत्र हेल्थ सर्व्हिस सेंटर व रुग्णालय आहे.

५) संग्रहालये आणि गॅलरीज:
अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बारा संग्रहालये आणि गॅलरीज आहेत. या संग्रहालयास प्रत्येक वर्षी जवळजवळ सव्वा लाख पर्यटक भेट देतात. स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जगप्रसिद्ध कँटर सेंटर फॉर विझ्युअल आर्ट्स हे वस्तूसंग्रहालय आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून अॅशमोलन म्युझियम या सतराव्या शतकातील संग्रहालयाचे व्यवस्थापन केले जाते. तसेच विद्यापीठाशी संबंधित डझनभर ऐतिहासिक वास्तू, शेल्डोनियन थियेटर इत्यादी वास्तूंची देखभाल घेतली जाते. केम्ब्रिज विद्यापीठाकडून एकूण आठ सांस्कृतिक आणि वैज्ञानिक संग्रहालयांचे व्यवस्थापन केले जाते. यामध्ये प्रसिद्ध फिट्जविल्लियम संग्रहालयाचा समावेश आहे.

इतर सुविधा: काही विद्यापीठांकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पहिल्या वर्षासाठी निवासाची सोय, पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीपूर्व तयारी अभ्यासक्रम, विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विविध आंतरराष्ट्रीय भाषा उदाहरणार्थ जपानी/जर्मन वा फ्रेंच किंवा इतर युरोपियन भाषा शिकण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, करिअर सपोर्ट सुविधा, तेथील निवासासाठी आवश्यक मार्गदर्शन, सांस्कृतिक व मनोरंजनाच्या विविध स्त्रोतांची माहिती यांसारख्या नानाविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याव्यतिरिक्त थोड्याफार फरकाने जवळपास सर्व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कॉलेज रेडीओ, कॉलेज टीव्ही, फेलिक्स न्यूजपेपरसारख्या संगीत, नाट्य व क्रिडा क्षेत्रातील इतर अनेक सोयीसुविधा परदेशी विद्यापीठांकडून उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

This entry was posted in परदेशातील उच्चशिक्षण, स्वरचित and tagged . Bookmark the permalink.

Leave a comment