सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी – भाग दोन

परदेशात उच्चशिक्षण घेताना: लेख क्रमांक १६

लेखक: प्रथमेश आडविलकर

सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीतील काही बाबींची माहिती यापूर्वीच्या लेखामध्ये आपण पहिली. उरलेल्या गोष्टींची माहिती या लेखामध्ये करून घेऊ.

• सर्व कागदपत्रांमध्ये महत्वाचे म्हणजे तुमचे एसओपी (Statement of purpose). कारण, फक्त प्रवेशच नाही तर तुम्हाला शिष्यवृत्ती किंवा शिक्षण शुल्कात जर विद्यापीठ सवलत देऊ पाहत असेल तर ते सर्वस्वी तुमच्या एसओपीवर अवलंबून असते. परदेशात उच्चशिक्षण घेण्यामागील हेतू विषद करणारा निबंध म्हणजेच एसओपी, अशी एसओपीची साधी व्याख्या करता येऊ शकते. तुम्ही परदेशात उच्चशिक्षणासाठी का जाऊ इच्छिता, ठराविक विद्यापीठ किंवा अभ्यासक्रम का निवडला, परदेशी विद्यापीठाने तुम्हाला उच्चशिक्षणासाठी प्रवेश का द्यावा, तुम्ही निवडलेल्या विषयात/अभ्यासक्रमात तुम्हाला कितपत गती आहे या सर्व बाबींचे थोडक्यात पण नेमके निबंधवजा विवेचन म्हणजे एसओपी. शक्य तेवढ्या लवकर तुमचे एसओपी लिहायला सुरुवात करा. त्यामध्ये तुमच्या शैक्षणिक- अशैक्षणिक कामगिरी, आवडी-निवडी, छंद इत्यादी गोष्टींबद्दल लिहा. अगदी तुम्ही केलेला एखादा व्यावसायिक प्रयोग वा तांत्रिक प्रकल्प किंवा सामाजिक उपक्रम या तुमच्या शाखेशी संबध नसलेल्या गोष्टींबद्दलही लिहू शकता. तसेच इतरांच्या तुलनेत तुमच्या एसओपीचे वेगळेपणसुद्धा जाणवायला हवे. जसे की, एसओपी अगदी अलंकारिक भाषेतही लिहू शकता किंवा संगणक अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे बरेचसे विद्यार्थी तांत्रिक भाषेत त्यांचे एसओपी लिहिताना आढळतात.

• शिफारसपत्र म्हणजेच एलओआर (Letter of recommendation). प्राध्यापकांऐवजी तुम्ही स्वत: तीन शिफारसपत्रे तयार करा. इंटरनेटवर प्रत्येक विषयानिहाय शिफारसपत्रांचे अनेक नमुने पाहायला मिळतील. शिफारसपत्रे महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या (यापैकी जे लागू असेल ते) लेटरहेडवर व्यवस्थित प्रिंट केलेली असावीत. त्यावर संबंधित विभाग वा महाविद्यालय अथवा विद्यापीठाचा शिक्का नीट मारलेला असावा. शिफारसपत्रावर संबंधित प्राध्यापकाचे पद लिहून त्यावर त्याची स्वाक्षरी असावी. या सर्व बाबी पूर्ण झाल्यावरच मग शिफारसपत्रे सील करावीत. सील केलेल्या लिफाफ्यावरसुद्धा स्वाक्षरी व शिक्के मारलेले असावेत. शिफारसपत्रे तयार करून घेताना एकदमच त्यांच्या दहा ते बारा प्रती तयार करून घ्याव्यात. स्वाक्षरी व शिक्का असलेल्या शिफारसपत्राची एक प्रत स्वत:जवळ ठेवा. कारण बहुतांश परदेशी विद्यापीठे प्राध्यापकांना सॉफ्ट प्रत अपलोड करायला सांगतात. एकूण तीन प्राध्यापकांकडून तीन शिफारसपत्रे (एलओआर) घ्या.

• पुढील महत्वाचे कागदपत्र म्हणजे ट्रान्सस्क्रिप्ट्स. ट्रान्सस्क्रिप्ट्स म्हणजे परदेशी विद्यापीठांना हव्या असलेल्या विशिष्ट स्वरुपात मांडलेले तुमचे पदवीचे गुणपत्रक. हे विद्यापीठाकडून स्वतंत्रपणे अर्ज करून मिळवावे लागते. शिफारसपत्राप्रमाणेच ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या सुद्धा दहा ते बारा प्रती विद्यापीठाकडून एकदमच घ्याव्यात.
• अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षामध्ये असतानाच विद्यार्थ्याने जीआरई/जीमॅट व टोफेल किंवा आयईएलटीएस यापैकी ज्या आवश्यक परीक्षा आहेत त्यांची तयारी सुरु करावी. योग्य नियाजनाद्वारे विद्यार्थी स्वत: या परीक्षांची तयारी व अर्ज प्रक्रियाही करू शकतात. त्यासाठी कोणत्याही क्लास किंवा कोचिंगची गरज नाही. या सर्व परीक्षांची माहिती स्वतंत्रपणे पुढील भागात दिली जाईल.

• तिसऱ्या वर्षात एकदा का विद्यार्थ्याने जीआरई/टोफेल परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवले की मग त्याने विद्यापीठांची निवड करण्यास सुरुवात करावी. सर्वसाधारणपणे बरेच अर्जदार विद्यार्थी सात किंवा आठ विद्यापीठांना अर्ज करतात. मात्र, किती विद्यापीठांना अर्ज करावेत यावर कोणतेही बंधन नाही. सर्व विद्यापीठांचे अर्ज शुल्क सारखे नसतात. योग्य विद्यापीठ कसे निवडावे याबद्दलदेखील स्वतंत्र माहिती पुढील भागात दिली जाईल.

• अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात असतानाच विद्यार्थ्याने अर्जप्रक्रियेस सुरुवात करावी. ऑनलाईन व कुरियरने अशा दोन टप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल. विद्यार्थी सर्व माहिती घेऊन स्वत: अर्जप्रक्रिया पूर्ण करू शकतात किंवा अर्जप्रक्रियेमधील मदत मिळवण्यासाठी एखादी कन्सल्टंसी निवडू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याने मात्र अर्ज करणार असलेल्या सर्व विद्यापीठाबद्दल स्वत: सर्व माहिती मिळवावी व त्याबाबतीत समांतरपणे संशोधन करावे. काही विद्यापीठे आर्थिक कागदपत्रे पाठवण्यासदेखील सांगतील. त्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे प्रवेश कार्यालयाला मेल करावीत.

• एकदा का ऑनलाईन अर्जप्रक्रिया पूर्ण झाली की मग सर्व कागदपत्रे कुरियरने प्रत्येक विद्यापीठाला पाठवायला विद्यार्थ्याने सुरुवात करावी. विद्यार्थी यासाठी एड्यूलिक्स किंवा स्टुपिडसिड सारख्या स्वस्त कुरियर सेवांचा वापर करू शकतात.

• सुरुवातीच्या एका किंवा दोन विद्यापीठांच्या निर्णयाला खुश होऊन उत्सुकतेपोटी होकार कळवू नये. सर्व विद्यापीठांकडून अंतिम निर्णय कळेपर्यंत थांबावे. सर्व विद्यापीठांच्या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा त्याबाबत विद्यार्थी समुपदेशक वा तज्ञांशी चर्चाही करू शकतात. आपल्याला योग्य अशा विद्यापीठाची निवड एकदा पक्की झाली की त्या विद्यापीठाला तसे कळवावे.

• परदेशी विद्यापीठाला विद्यार्थ्याने प्रवेशाबाबत होकार कळवला की विद्यापीठ विद्यार्थ्याला आय -२० फॉर्म पाठवते. हा फॉर्म म्हणजे विद्यार्थ्याने पूर्ण करून विद्यापीठाला परत पाठवला की त्याचा प्रवेश अधिकृत झाला असे समजण्यात येते. प्रवेश अंतिम होतो तो अर्थातच, आर्थिक सोपस्कार पूर्ण झाल्यावर.

• आय- २० नंतरचा पुढील टप्पा म्हणजे विसा मुलाखत. इन्टरनेटवरून विसा मुलाखतीच्या प्रश्नोत्तरांबद्दल माहिती मिळवून विद्यार्थी विसा मुलाखतीची तयारी करू शकतात. विसाच्या मुलाखत व कागदपत्रांची पूर्ण तयारी झाल्यावर आपल्याला हव्या त्या तारखेस विसा मुलाखतीची नोंदणी करावी. विसा मुलाखतीच्या दिवशी सर्व प्रश्नांना आत्मविश्वासाने सामोरे जा. सर्व प्रश्नांची थोडक्यात व प्रामाणिक उत्तरे द्या. विसा मिळाल्यानंतर मगच विमानाचे तिकीट बुक करा.

This entry was posted in परदेशातील उच्चशिक्षण, स्वरचित and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a comment