परदेशातील विद्यापीठांची अर्जप्रक्रिया

परदेशात उच्चशिक्षण घेताना: लेख क्रमांक ५

लेखक: प्रथमेश आडविलकर

गेल्या काही भागांमध्ये आपण परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या देशांनुसार द्याव्या लागणाऱ्या प्रवेशपरीक्षांची माहिती पाहिली. या देशांमधील विद्यापीठांना अर्ज कसा करायचा व त्याबाबत आवश्यक असलेली अर्जप्रक्रिया व इतर आवश्यक बाबींबद्दल माहिती आजच्या लेखात विस्तृतपणे दिलेली आहे.

अर्जप्रक्रिया व त्यातील काही समान गोष्टी


परदेशातील बहुतांश विद्यापीठांमध्ये दोन वेगवेगळे शैक्षणिक सत्र असतात. फॉल आणि स्प्रिंग. साधारणतः ऑगस्टमध्ये सुरु होणाऱ्या शैक्षणिक सत्राला फॉल म्हणतात तर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या आसपास सुरु होणाऱ्या सत्राला स्प्रिंग असे म्हणतात. विद्यार्थ्याला फॉल किंवा स्प्रिंग यापैकी एका सेमिस्टरला अर्ज करावा लागतो. अर्ज करताना अर्जाची फी मात्र प्रत्येक देशातील विद्यापीठावर अवलंबून असते. वरील तिन्ही देशांपैकी कुठेही अर्ज करताना अर्जासहित विद्यार्थ्याने एस.ओ.पी. (Statement of Purpose), त्याचा सी.व्ही., दोन प्राध्यापक किंवा तज्ञांची शिफारसपत्रे (Letter of Recommendations), आतापर्यंतच्यासर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्स्च्या अधिकृत प्रती इत्यादी कुरियरने त्या विद्यापीठाकडे पाठवाव्यात. यापैकी काही गोष्टी प्रत्येक विद्यापीठाच्या गरजेनुसार वेगवेगळ्याही असू शकतात. त्या त्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर अर्ज कसा करावा याबद्दल विस्तृतपणे माहिती दिलेली असतेच. ती तपासून मगच अर्ज करावा. परदेशात प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे आरोग्य विमाकवच घ्यावे लागते. प्रत्येक देशाच्या निकषांनुसार आरोग्य विम्याची रक्कम मात्र वेगवेगळी असेल. कोणत्याही देशात विद्यार्थ्याला उच्चशिक्षण घ्यावयाचे असो त्याची इंग्रजीवर प्रभुत्व आणि शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम असणे गरजेचे आहे. तसेच GRE, TOEFL, GMAT किंवा IELTS या परीक्षांमध्ये किमान गुण परदेशी विद्यापीठात फक्त प्रवेश मिळवून देऊ शकतात. मात्र जर चांगल्या विद्यापिठामध्ये प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्याला संबंधित परीक्षेत उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याकडे जर कामाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र असेल किंवा संशोधनाच्या बाबतीत त्याचे ‘संशोधन प्रबंध’ प्रकाशित झाले असतील तर प्रवेशाच्या संधी जास्तपटीने वाढतात हे लक्षात घ्यावे. अर्जाच्या प्रक्रियेपासून ते प्रवेश मिळेपर्यंत इतर दोन देशांच्या तुलनेत अमेरिकन अर्जप्रक्रिया जास्त खर्चिक आहे.

पीएचडी का एमएस?


भारतातून परदेशी उच्चशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडलेला हा मोठा प्रश्न असतो. पीएचडीसाठी विद्यापीठाकडून मासिक आर्थिक भत्ता सहज उपलब्ध होते. पण पीएचडीला प्रवेश मिळवणे खूप कठीण आणि स्पर्धात्मक असते. पीएचडीला अर्ज करू इच्छिणाऱ्या अर्जदाराला आपण पीएचडीसाठी अर्ज का करतोय हे व्यवस्थितपणे माहित असायला हवे. म्हणजे कोणीतरी मित्रमैत्रिणी पीएचडीला अर्ज करताहेत म्हणून किंवा उत्तम आर्थिक वेतन मिळवायचे आहे म्हणून पीएचडीला अर्ज करायचा निर्णय घेऊ नये. परदेशात विज्ञान किंवा अभियांत्रिकीमध्ये पीएचडी करणे हे समर्पित भावनेने करावयाचे काम आहे. पीएचडीला अर्ज करण्याअगोदर संशोधन म्हणजे नेमके काय हे पूर्णपणे समजून घ्यावे व नंतर आवश्यक ती तयारी करून पीएचडीला अर्ज करावा.

आर्थिक मदतीबद्दल


परदेशातील शिक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला शिष्यवृत्ती किंवा एखादी पाठ्यवृत्ती तरी मिळावी अशी इच्छा असते. कारण त्यामध्ये मग ट्युशन फी भरता येते व त्याबरोबरच तिथल्या वास्तव्याचा व खर्चाचा प्रश्न निकाली निघतो. अमेरिकेमध्ये मात्र आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता खूप कमी असते. मात्र विद्यार्थ्याला ‘ट्युशन फी वेव्हर’ म्हणजेच ट्युशन फीमधून मुक्तता मिळू शकते. मग आर्थिक प्रश्न कसा सोडवायचा? अमेरिकेतील प्रत्येक विद्यापीठाला तेथील औद्योगिक क्षेत्राचे मोठे पाठबळ मिळत असते. त्या पाठबळावर विद्यापीठ जमेल तेवढ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्याकडील ‘कमवा आणि शिका’ योजनेसारखे त्या विद्यापीठाच्या आवारात अर्धवेळ काम (Part time job) करण्याची मुभा देते. ही कामे विद्यापीठाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, ग्रंथालयातील पुस्तकांच्या कामापासून ते कनिष्ठ विद्यार्थ्यांना एखादा विषय शिकवण्यासारखी ही कामे असतात. अमेरिकतल्या विसा नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यात एकूण वीस तास काम करण्याची परवानगी मिळते. हाच नियम जर्मनी व युकेमध्येही लागू आहे. सुट्टीमध्ये तर विद्यार्थी या तिन्ही देशांमध्ये पूर्णवेळ काम करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम असेल त्यांना रिसर्च असिस्टंट (RA) तर काही विद्यार्थ्यांना टीचिंग असिस्टंट (TA) म्हणून काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी त्यांना उत्तम वेतनही दिले जाते. कोणतेही अर्धवेळ काम असो, विद्यार्थ्याला त्या शहराच्या खर्चानुसार किमान मासिक वेतन मिळावे एवढी काळजी विद्यापीठाने घेतलेली असते. जर्मनी व युकेमध्ये साधारणपणे एका तासाला सहा ते सात युरो एवढ्या दराने विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन दिले जाते. ‘ट्युशन फी वेव्हर’साठी विद्यार्थ्याने विद्यापीठाचे निकष वेबसाईटवर तपासावेत. तसेच विद्यापीठाकडून दिले जाणारे अर्धवेळ काम हे गृहीत धरू नये. कारण हे काम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दिले जाते. तसेच विद्यापीठाकडून मिळणारे अर्धवेळ काम, असिस्टंटशिप किंवा शिष्यवृत्ती ह्या सर्व गोष्टी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असतात.

This entry was posted in परदेशातील उच्चशिक्षण, स्वरचित and tagged . Bookmark the permalink.

Leave a comment