ओळख जागतिक दर्जाच्या विद्यापीठांची – भाग एक

परदेशात उच्चशिक्षण घेताना: लेख क्रमांक ११

लेखक: प्रथमेश आडविलकर

परदेशातील उच्चशिक्षण घेण्यापूर्वी योग्य अभ्यासक्रमाची निवड करणे व त्यासाठी उपयुक्त असलेले योग्य विद्यापीठ निवडणे ही निश्चितच कसोटीची बाब आहे. योग्य विद्यापीठाची निवड करण्यासाठी त्या विद्यापीठाचा जागतिक क्रमवारीतील क्रमांक तपासणेही महत्वाचे आहे. जगभरातील सर्वच प्रमुख विद्यापीठांचे जागतिक क्रमवारीतील क्रमांक टाइम्स न्यू रोमन व क्यू एस वर्ल्ड यांसारख्या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या दर्जेदार संस्था ठरवतात. ही क्रमवारी विषय, प्राध्यापक, संशोधन, कॅम्पस, रोजगार कौशल्ये, प्लेसमेंट्स व शिक्षणेतर पूरक उपक्रम इत्यादी गोष्टींनुसार ठरवली जाते. क्यू एस वर्ल्ड आंतरराष्ट्रीय क्रमवारीनुसार जागतिक क्रमवारीतील काही अग्रगण्य विद्यापीठांची ओळख या लेखामध्ये करून घेऊ.


१) मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी): क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पहिल्या क्रमांकाचे विद्यापीठ असलेल्या अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठाची स्थापना दि. १० एप्रिल १८६१ रोजी झाली. एमआयटी या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य ‘माइंड अॅण्ड हँड ’ अतिशय बोलके व विद्यापीठाची विचारधारा अधोरेखित करणारे आहे. हे ब्रीदवाक्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवनात आमुलाग्र बदल करण्याच्या विद्यापीठाच्या हेतूंना अधिक बळकट करणारे आहे. १८६१ मध्ये सुरुवातीला एमआयटी तत्कालीन अमेरिकी समाजातील समस्या निवारण करण्यासाठी एकत्र आलेल्या समविचारी विज्ञानप्रेमी लोकांचा एक छोटासा समुदाय होता. आज मात्र एमआयटीमध्ये सुमारे एक हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून अकरा हजारांहूनही जास्त पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. एमआयटी आता एक स्वतंत्र, सहशैक्षणिक,खाजगी मान्यताप्राप्त विद्यापीठ असून पाच प्रमुख स्कूल्स (विभाग)च्या – आर्किटेक्चर अॅण्ड प्लॅनिंग, अभियांत्रिकी, मानववंशशास्त्र ,कला आणि सामाजिक विज्ञान, व्यवस्थापन व विज्ञान माध्यमातून आपले विद्यादानाचे कार्य करत आहे. आजदेखील अभिनव शैक्षणिक कल्पनेचा सिद्धांत एमआयटीच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा अविभाज्य घटक आहे. एमआयटी विद्यापीठाच्या शिक्षण-संशोधनातील सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे इथल्या प्राध्यापक-विद्यार्थीवर्गाने कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान अनुकूलता, एचआयव्ही, कर्करोग आणि दारिद्र्य निर्मूलनासारख्या विविधांगी विषयांतील संशोधनात मोलाचे योगदान दिलेले आहे. याअगोदरदेखील एमआयटी विद्यापीठाने केलेल्या महत्वाच्या संशोधनात रडार तंत्राचा विकास, मॅग्नेटिक कोअर मेमरीचा शोध आणि विस्तारित विश्वाची संकल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.


२) स्टॅनफर्ड विद्यापीठ: क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ असलेल्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात असलेल्या स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना १८९१ रोजी झाली. विद्यापीठाचे ब्रीदवाक्य जर्मन भाषेमध्ये असून त्याचे इंग्रजी भाषांतर ‘ब्लो ड विंड ऑफ फ्रीडम’ असा आहे. एकूणच ते तत्कालीन राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक परिस्थितीस पूरक आहे. सुरुवातीपासूनच स्टॅनफर्ड विद्यापीठ मुक्त विचारांचे, सह-शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सहजी परवडणारे असे होते. त्यामुळेच विद्यापीठाने अगदी तेव्हापासूनच पारंपरिक उदार कला ते अभियांत्रिकी-तंत्रज्ञान अशा विविधांगी बाबींतील विद्यादानाचे कार्य केले.क्षेत्रफळाच्या बाबतीत साधारणपणे ८१८० एकर एवढा मोठा परिसर लाभलेले स्टॅनफर्ड विद्यापीठ हे अमेरिकेतील एकमेव विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये एकूण अठरा आंतरविद्याशाखीय संशोधन संस्था आणि सात प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग पसरलेले आहेत. आजघडीला स्टॅनफर्डमध्ये २२१९ तज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून १६४२४ पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.


३) हार्वर्ड विद्यापीठ: अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यातील केम्ब्रिज या शहरात वसलेले हार्वर्ड विद्यापीठ हे क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. संस्थापक जॉन हार्वर्ड यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठाचे नाव ‘हार्वर्ड विद्यापीठ’ असे देण्यात आले. या विद्यापीठाची स्थापना १६३६ साली झाली असून अमेरिकेतील ते सर्वात जुने शैक्षणिक केंद्र तर आहेच मात्र या विद्यापीठाच्या स्थापनेपासूनचा त्याचा इतिहास, समाजातील विविध घटकांवर असलेला त्याचा प्रभाव आणि विद्यापीठाची संपत्ती या गोष्टींमुळे हार्वर्ड हे जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत विद्यापीठांपैकी एक आहे. ‘व्हेरिटास’ म्हणजे सत्य हे हार्वर्ड विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. हार्वर्ड विद्यापीठ एकूण २०९ एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. यामध्ये विद्यापीठाच्या प्रमुख दहा कार्यालयीन वास्तू, रेडक्लिफ इन्स्टिटयूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी, दोन नाट्यगृहे आणि पाच संग्रहालये इत्यादी वास्तूंचा समावेश आहे. याशिवाय या परिसरात विद्यापीठाचे ग्रंथालय जे वीस दशलक्ष पुस्तके, १८०००० सिरीयल टायटल्स, अंदाजे ४०० दशलक्ष हस्तलिखित आणि दहा दशलक्ष फोटो इत्यादी स्त्रोतांनी सुसज्ज असलेले जगातील सर्वात मोठे शैक्षणिक वाचनालय देखील आहे. विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये बारा प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग आणि रेडक्लिफ इन्स्टिटयूट फॉर अॅडव्हान्स्ड स्टडी सारखे प्रगत शैक्षणिक केंद्र व त्यासारखेच इतर अजून दोन विभाग असे एकूण पंधरा महत्वाचे विभाग वा स्कूल्स आहेत. आज हार्वर्डमध्ये सुमारे साडेचार हजारपेक्षाही अधिक प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास सात हजार पदवीधर तर पंधरा हजारांहून अधिक पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. जागतिक बुद्धिमत्तेची स्पर्धा करू शकणारे कुशाग्र मेंदूच फक्त हार्वर्डमध्ये प्रवेश मिळवू शकतात, हे गेली कित्येक वर्षे एखाद्या सूत्राप्रमाणे सिद्ध होत आले आहे.


४) कॅल्टेक: कॅल्टेक या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेली कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले चौथ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्यात असलेल्या या विद्यापीठाची स्थापना १८९१ साली झालेली आहे. कॅल्टेक हे एक खाजगी विद्यापीठ असून अमेरिकेतील इतर सर्व विद्यापीठांसारखे मोठ्या प्रमाणावर संशोधन करणारी संस्था आहे. हे विद्यापीठ, नैसर्गिक विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील त्याच्या सामर्थ्यासाठी जगभर ओळखले जाते आणि म्हणूनच जगभरातील प्रमुख पाच विद्यापीठांमध्ये कॅल्टेकला स्थान देण्यात आले आहे. ‘द ट्रुथ शाल मेक यू फ्री’ हे विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. लॉस एंजिलीसपासून अठरा किलोमीटर पूर्व-उत्तरेस स्थित असलेल्या कॅल्टेक विद्यापीठाचा एकूण परिसर हा १२४ एकरांचा आहे.विद्यापीठाच्या या कॅम्पसमध्ये एकूण सहा प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग पसरलेले असून विद्यापीठाचा मुख्य भर हा मुलभूत व उपयोजित विज्ञान आणि अभियांत्रिकी या विद्याशाखांवर आहे. सध्या कॅल्टेकमध्ये तीनशे तज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून दोन हजारपेक्षाही अधिक पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.


५) ऑक्सफर्ड विद्यापीठ: ऑक्सफर्ड विद्यापीठाला स्वतंत्रपणे ओळखीची गरज नाही. इंग्रजी भाषेमध्ये सर्व अभ्यासक्रम चालणाऱ्या विद्यापीठांपैकी सर्वात प्राचीन असलेले हे जगद्विख्यात विद्यापीठ क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले पहिल्या पाचमध्ये नेहमीच राहिलेले आहे. इंग्लंडमध्ये असलेल्या या विद्यापीठामध्ये प्रचलित पद्धतीच्या अध्ययन-अध्यापन सुमारे एक हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. १०९६ साली होत असल्याचे काही पुरावे अस्तित्वात आहेत. ऑक्सफर्ड हे एक खाजगी विद्यापीठ असूनही संस्थेस शासकीय निधी मिळतो. साहित्य व इंग्रही भाषा यासाठीऑक्सफर्ड विद्यापीठ ओळखले जाते आणि म्हणूनच जगभरातील प्रमुख पाच विद्यापीठांमध्ये ऑक्सफर्डला स्थान देण्यात आले आहे. ‘द लॉर्ड इज माय लाईट’ हे ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ ३८ घटक महाविद्यालये आणि चार प्रमुख शैक्षणिक विभाग मिळून बनलेले आहे. विद्यापीठातील ही सर्व महाविद्यालये स्वयं-शासित असून प्रत्येक महाविद्यालय स्वत:च्या अंतर्गत शैक्षणिक व संशोधन रचना नियंत्रित करते. दक्षिण-मध्य इंग्लंडमध्ये असलेल्या ऑक्सफर्ड शहरातील या विद्यापीठास मुख्य कॅम्पस नाही मात्र शहरभर विद्यापीठाच्या इतर कॅम्पसमध्ये विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, महाविद्यालये, निवासी व्यवस्था इत्यादी गोष्टी पसरलेल्या आहेत. सध्या ऑक्सफर्डमध्ये जवळपास १८०० तज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास पंचवीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.

This entry was posted in परदेशातील उच्चशिक्षण, स्वरचित and tagged . Bookmark the permalink.

Leave a comment