पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक १९

परीक्षण क्रमांक : १९

दिनांक: २१ मार्च २०२३

पुस्तकाचे नाव: पाखरमाया

लेखक : मारुती चितमपल्ली

ग्रंथपेटी क्रमांक: १४

पुस्तक क्रमांक: ३३०

परीचयकर्ती आणि समन्वयिका : सौ.स्नेहल देशपांडे, इंटरनॅशनल सिटी

मारुती चितमपल्ली हे माझे अत्यंत आवडते लेखक! त्यांचे रानवाटा, नवेगावबांधाचे दिवस ही पुस्तके वाचल्यापासून मी त्यांच्या अरण्यजीवनाच्या ज्ञानाने अचंबित झाले आहे. त्यांना जंगले, पशू,पक्षी ,प्राणी याबद्दल लहानपणापासून कुतुहुल होते आणि ते सतत त्यांचे निरीक्षण करीत. नंतर त्यांनी त्यातच शिक्षण घेतले व वनाधिकारी म्हणून काम करताना आलेले अनुभव लिखाणाच्या माध्यमातून संग्रहित केले.

जी. ए. कुलकर्णी यांनी त्यांच्या जंगलाच्या वेडाबद्दल अत्यंत सुरेख शब्दात लिहिले आहे ” तुमच्या पावलांना रानवाटांची एक माहेरओढ आहे.”

‘पाखरमाया ‘ पुस्तकाची सुरुवात वेगवेगळे पक्षी कशी घरटी बांधतात याबद्दल माहितीने होते. साधारणपणे पक्षी आपली घरटी कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ,गूढ पद्धतीने बांधतात. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे कठीण काम आहे. पण त्यासाठी लागणारा संयम व साधना लेखकाकडे आहे. तासनतास एकच जागी न हलता बसून त्यांनी हे निरीक्षण केले आहे. त्यात आपल्याला खूपच रंजक व उद्बोधक माहिती मिळते.
लावा आणि पाणपिपुली यामध्ये फक्त नर अंडी उबवतात तर इतर बऱ्याच पक्ष्यात नर मादी आळीपाळीने अंडी उबवतात. कावळा आपल्या घरट्याच्या काड्या दुसऱ्या घरट्यातून चोरतो अशी गंमत पण त्यांना निरीक्षणात आढळली.

‘ओल्या रानाचा नाद’ यामध्ये त्यांनी पावसाळ्यात जंगलात होणारे बदल टिपले आहेत. पावसाच्या आवाजाने वाळव्या कशा बाहेर येतात आणि घोरपड त्यांच्यावर कशी तुटून पडते हे वाचताना अंगावर काटा येतो.

‘वानराची शेकोटी ‘मध्ये ते आदिवासींच्या आणि गावकऱ्यांच्या अनुभवातले सत्य तपासून बघतात. वानरे थंडीमध्ये शेकोटिसारख्या काटक्या रचून त्यासमोर बसून राहतात. शेकोटी पेटवली नसतानाही त्यांना त्यात ऊब मिळते किंवा ते त्यातील उष्णता शोषून घेतात.आणि नंतर ती लाकडे काही केल्या परत पेटवता येत नाही. सृष्टीत अशा अद्भूत गोष्टी घडतात हे पुस्तक वाचून कळते .

‘वांब -एक गूढ प्रवासी मासा ‘ यात इल माशाचा नदीपासून समुद्र आणि परत नदीकडे अस जीवन प्रवास वाचताना आपल्याला खूप वेगळीच माहिती मिळते . त्यात ते अरिस्टोटल पासून जगभरातील इतर जीवशास्त्र अभ्यासकांचा संदर्भ देतात. ते वाचून या लेखकाचा व्यासंग कितीं खोल आहे याची जाणीव होते . पण खरा अभ्यास ते जंगलात राहणारे आदिवासी ,धीवर,कोळी यांच्याबरोबर नदी ,ओहोळ फिरून करतात. समुद्रकिनारी,तळ्याकाठी महिनोन महिने राहून करतात. खरेच ते आधुनिक काळातले ऋषी आहेत.

‘हठयोगी बेडूक’, ‘ चेलपतंग- एक शिल्पकार” ,’ कीटकांच्या अद्भुत जगात ‘ ‘ काजवे: अंधारातील प्रकाश ‘ असे वेगवेगळे लेख वाचताना त्यांच्यातील कविमनाची साक्ष पटते. त्यांनी खास संस्कृत शिकून जुने ग्रंथ अभ्यासून त्यातील पक्षी,प्राण्यांचे संदर्भ आजच्या काळात तपासून बघितले आहेत. तसेच जैन दर्शने, पाली भाषेतील साहित्य, जपानी हायकू ,रोमी चे काव्य यांचे संदर्भ ते जागो जागी देतात तेंव्हा त्यांच्या रसिक मनाची साक्ष पटते. त्यामुळेच हे पुस्तक केवळ माहिती पुस्तकं न राहता ,अत्यंत रोचक काव्यमय साहित्य बनले आहे.

‘पावसाचे झाड ‘ , ‘वृक्ष पंचक’ , ‘ कुसुमगुंजा ‘ यात त्यांनी बाभळी सारख्या काही दुर्लक्षित पण महत्वाच्या वृक्षांची माहिती दिली आहे.

“शुक्राची चांदणी ‘ ‘रात्रीचे आकाश ‘ , ‘ सोन्याचा पिंपळ ‘ यात ते बौद्ध साहित्य, ज्ञानेश्वर ,महानुभाव यांच्या साहित्यातील ओव्या स्वतः अनुभवताना त्याचे प्रत्यक्षदर्शी वर्णन केले आहे.

‘ नाद सुरूच्या बनाचा ‘ यात अरण्याचे वैभव, तिथले विविध नाद ,तिथला अंधार, भीतीदायक निशब्दता आणी तरीही सतत होणारी हालचाल व गतिमानता यांचे ते अत्यंत चित्रमय वर्णन करतात व आपण प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर फिरत आहोत असा आभास आपल्याला होतो.

निसर्गामध्ये एकतानता अनुभवताना त्यांनी योगसिद्धीचा अनुभव कसा घेतला ते खरेच वाचण्यासारखे आहे. वृक्षांना जीव असतो हे भारतीयांना हजारो वर्षापासून ज्ञात होते हे महाभारतात भृगू आणि भारद्वाज ऋषींच्या संवादातून आपल्याला ते सांगतात.

तसेच ‘उपवन विनोद’ सारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथात अंगणात, शेतात, रस्त्याच्या काठी कुठले वृक्ष लावावे,त्यांची निगराणी कशी राखावी याबद्दल जे सूक्ष्म निरीक्षण व ज्ञान आहे ते नवीन अभ्यासक्रमात शिकवून त्याचा आपण सद्यकालात उपयोग केला पाहिजे असे ते आवर्जून सांगतात .अत्यंत माहितीपूर्ण,रोचक असे हे पुस्तक सगळ्यांनी वाचावे तसेच संग्रही ठेवावे इतके उत्तम आहे.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , , . Bookmark the permalink.

Leave a comment