पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३: परीक्षण क्रमांक १८

दिनांक : १८ मार्च २०२३

परीक्षण क्रमांक: १८

पुस्तकाचे नाव: धार आणि काठ

लेखक: नरहर अंबादास कुरुंदकर

पुस्तक क्रमांक: २४

पेटी क्रमांक :

परिचयकर्ता : हरि अग्निहोत्री

समन्वयिका: सौ. नेहा अग्निहोत्री, द गार्डन्स

नरहर कुरुंदकर हे नाव पहिल्यांदा ऐकलं होत ते फार पूर्वी ८२ -८३ मध्ये. आजोबांनी नाव उच्चारल व भुवया फक्त वर केल्या होत्या. त्याचा प्रभाव मात्र मनावर कोरला गेला होता. पुढे पुलंच्या भाषणाच पुस्तकं रूपाने प्रसिध्द झालेल्या पुस्तकात एक भाषण नरहर कुरुंदकरां वर पण होत. केवळ भाषण नव्हतं तर तो एक मृत्युलेखच होता.

ग्रंथपेटी मध्ये धार आणि काठ-लेखक नरहर कुरुंदकर बघितलं आणि प्रथम तेच वाचायला घेतलं, त्याची कारणं वर दिलेली. अर्थात तेवढं एकच नव्हतं तर Facebook वर पण त्यांचं एक पेज आहे आणि त्यावरील विविध विषयावरील त्यांची मतं वाचली आणि लक्षात आलं की अतिशय मुलभूत विचार ते करायचे आणि निर्भिड पणे मांडायचे पण. धार आणि काठ हे पुस्तक त्यांनी मराठी कादंबरी कशी विकसित होत गेली ह्या वर लिहिले आहे. ह्याचं नावच मोठं आशयघन आहे – नदीच्या वाहत्या पाण्याची धार आणि त्याचे तयार होत गेलेले काठ.

ह्यामध्ये त्यांनी स्वतःला एक काळाची मर्यादा घालून घेतली आहे आणि तो साधारणतः १८४१ ते १९७१ पर्यंत चां काळ गृहीत धरलेला आहे.
कादंबरी हि कशी सुरुवातीला प्रचारकी थाटाची होती आणि मग त्यात सुरुवातीचा बाळबोध पणा जाऊन आधी व्यक्ती विकास मग संवाद, विचार, मनातील आंदोलनं, निसर्ग वर्णन वगैरे गोष्टी कशा विकसित होत गेल्या हे त्या त्या कालखंडातील प्रातिनिधिक कादंबऱ्यांचे विश्लेषण करता करता दाखवून दिलेलं आहे. हे करत असताना त्यांनी इतक्या बारकाईने सर्वांगाने लिहिले आहे की मन थक्क होतं.

सुरुवात बाबा पदमनजी ह्यांच्या ‘यमुना पर्यटन ‘ या कादंबरी पासून केलेलं आहे. हि ख्रिस्ती व्यक्तीने लिहिलेली प्रचारक हेतू मनात धरून लिहून ठेवलेली असल्याने मग त्यातील व्यक्तिरेखा ह्या कशा ठरलेल्या मार्गाने जात राहतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. अशा अतिशय जुन्या काळातल्या महत्त्वाच्या कादंबऱ्यांवर लिहिताना(त्याही मैलाचा दगड ठरतील) अशा कादंबऱ्यांचे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारां मधे विभागणी केलेली आहे- बोधप्रद, रंजनवादी, ऐतिहासिक वगैरे. हे लिहिताना त्यांची लेखणी ,त्यातील अनेक अंगावर ज्या विचारपूर्वक समीक्षात्मक टीका टिप्पणी करत जाते , ते अतिशय रसाळ भाषेत लिहिले आहे. साधारणतः समीक्षा म्हणजे जड अवघड विद्वत्तापूर्ण अशी भाषा आणि आपण त्यामधून काहीतरी महत्त्वाचं उलगडून दाखवतोय अशा थाटाची असते आणि म्हणुनच ती कधी कधी रुक्ष होते. नेमक्या ह्याच समजुतीला छेद देत कुरुंदकरांनी त्या त्या कादंबरीच्या प्रत्येक अंगावर विचार करत तरीही ओघवत्या भाषेत ही समीक्षा केली आहे. आणि ती करत असताना जणू काही एखादी कादंबरीच वाचतो आहोत असे वाटावे इतक्या खुबीने त्यांनी वाचकाला वाचत केलं आहे ही मला वाटतं ह्या समीक्षा ग्रंथाची मोठीच जमेची बाजू झाली आहे.

हळबे (मुक्तामाला), गुंजिकर (मोचनगड), हरी नारायण(पण लक्षात कोण घेतो) वामन मल्हार(रागिणी), केतकर (विचक्षणा) करत करत ते मग फडके युगावर येऊन पोचतात. साधारणतः आपल्याला फडके ह्यांच्या कादंबरी बद्दल कल्पना असते पण तिचं स्वरूप उलगडून दाखवण्यासाठी कुरुंदकरच पाहिजेत, इतकं त्यांनी त्यातली मर्मस्थळ दाखवून दिली आहेत. ‘रणांगण ‘ विश्राम बेडेकर ह्याविषयी पण त्यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. त्याचप्रमाणे ऐतिहासिक कादंबरी – श्रीमान योगी आणि स्वामी ह्या दोन कादंबऱ्यांवर कौतुकास्पद लिहिलं आहे. ययाति वर मात्र त्यांनी अतिशय विस्तृत लिहिले आहे. ती कादंबरी ही निःसंशय सर्वात लोकप्रिय होती आणि ती का हे पण त्यांनी सविस्तर लिहिले आहे.
अर्थातच मग त्याच अनुषंगाने लेखक आणि संपादक/प्रकाशक ह्यामधील संबंध नेमके कसे असतात हे विषद करण्यासाठी त्यांनी चक्क उभयतांमधील पत्र व्यवहार च काही प्रकरणांमध्ये समाविष्ट केला आहे आणि प्रकाशकाच्या काही आक्षेपांना ठाम उत्तर दिलेलं आहे.
आणि ह्या पुस्तकातील अतिशय महत्वाचा भाग त्यांनी शेवटी ठेवला आहे.

सुरुवातीपासूनच त्यांचा मराठी कादंबरी वर एक आक्षेप आहे की एकही मराठी कादंबरी उच्चतम टोकाला पोचली नाही.आणि इथे त्यांनी त्यावेळेच्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या पण भारतीय समाज जीवन प्रतीबिंबित असलेल्या बंगाली कादंबऱ्यांचl आधार घेतला आहे. शरदचंद्र चटर्जी ह्यांच्या विविध कादंबऱ्यांचे विस्तृत समीक्षण करून दाखवून दिलेलं आहे की का मराठी कादंबरी ती उंची गाठू शकली नाही.म्हणूनच धार आणि काठ वाचक ज्यावेळेस वाचून संपवतो त्या वेळेस त्याला मराठी कादंबऱ्यांचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करता येतो आणि त्या बरोबरच एकूणच समग्र जीवनाच्या विविध गोष्टींकडे (म्हणजे त्यात नाटक आलं, सिनेमा आला, कथा आल्या) बघण्याचा व्यापक दृष्टिकोण येतो आणि काय चांगलं काय सुंदर आणि काय उच्चीचं ह्याची समज येते.मला वाटतं हीच ह्या पुस्तकाची मोठीच जमेची बाजू आहे.नरहर कुरुंदकर ह्या लेखकाची पुस्तकं आता नेहेमीच रडार वर असतील

.

This entry was posted in स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव – पुस्तक परीक्षण उपक्रम २०२३ and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment